पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आय जी ऑफिसचे हवालदार ए. एन. तुक्कार यांना मुख्यमंत्री पदक प्रदान करण्यात आले.शुक्रवारी पोलीस ध्वज दिना निमित्त बंगळूरू येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा आणि गृहमंत्री बसवराज बोंमाई यांनी पदक दिले.
पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील 115 अधिकारी आणि पोलिसांची मुख्यमंत्री पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये आय जी ऑफिसचे हवालदार ए. एन. तुक्कार यांचाही समावेश आहे. तुक्कार हे मूळचे हुदली (ता. बेळगाव) येथील रहिवासी आहेत. पोलीस दलाच्या तांत्रिक विभागांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची मुख्यमंत्री पदकासाठी निवड झाली होती त्यानुसार बेंगलोर येथे आयोजित केलेल्या खास समारंभामध्ये त्यांना हे पदक बहाल करण्यात आले.
हुदली येथील प्रगतशील शेतकरी नागाप्पा लक्ष्मण तुक्कार यांचे ते चिरंजीव आहेत. ए. एन. तुक्कार यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले असून लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आहे.
एनसीसीमुळे आपल्या जीवनाला शिस्त लागली आणि त्यामुळेच आपण पोलीस दलात प्रवेश केला असे तुक्कार सांगतात. मुख्यमंत्री पदकासाठी निवड झाल्याबद्दल हवालदार ए. एन. तुक्कार यांचे पोलिस दलासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.