हिरेबागेवाडी येथे सर्पदंश झाल्यामुळे प्रकृती खालावलेल्या सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मदतीला धावून जाताना फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या टिमने त्यांच्यासाठी अवघ्या अर्ध्या तासात 5 युनिट रक्त उपलब्ध करून दिले आहे.
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना गुरुवारी सकाळी हिरेबागेवाडी येथे सर्पदंश झाल्याची घटना घडली. विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती अस्ताव्यस्त झालेल्या 40 वर्षीय चिठ्ठी यांना तातडीने केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्पमित्र आनंद चिठ्ठी त्यांच्यावर केएलई हॉस्पीटल येथील मार्कडेंय वाॅर्डच्या अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्यांना तातडीने रक्ताची गरज होती. या आपत्कालीन परिस्थितीत फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, प्रा. भरमा कोलेकर, राहुल चिकोर्डे व अँब्युलन्स चालक गणेश रोकडे हे मदतीला धावून आले.
दरेकर यांनी रक्तदात्यांची संपर्क साधून कार आणि अँब्युलन्समधून अवघ्या 30 मिनीटात त्यांना घेऊन हॉस्पीटल गाठले. तसेच आनंद चिठ्ठी यांच्यासाठी 5 युनिट रक्त उपलब्ध करून दिले. यासाठी आनंद शाह, विनायक रायचन्नवर, निखिल बाळेकुंद्री, अजनास सय्यद व हितेश खोडा या रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याचवेळी मलप्रभा वाॅर्ड येथील रालिया मोहरे या रुणाला देखील रक्ताची आवश्यकता होती. यावेळी चेतन भागी यांनी त्यांना रक्तदान केले. दरम्यान सर्पांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणार्या सर्प मित्राच्या मदतीला फेसबुक फ्रेंड्स सर्कल क्षणाचाही विलंब न करता धावून गेले. तत्परतेने पुढाकार घेत
कठिणप्रसंगी सहकार्य केल्याबद्दल आनंद चिठ्ठी यांच्या कुटुंबीयांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांचे व रक्तदात्यांचे आभार मानले. सोशल मिडियांने आपली दखल घेतल्याबद्दल चिठ्ठी कुटुंबीयांनी त्यांचेही आभार मानले आहेत.