बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चौघा जणांनी स्वच्छेने आपापले उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांच्यासह अन्य कांही इच्छुकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्व चार उमेदवारांनी आज स्वमर्जीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन अधिकृत उमेदवार श्रीमती मंगला अंगडे यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
अशोक पंड्याप्पा हंजी, हणमंत शिवाप्पा नागनुर, बसवराज दुंडाप्पा हुद्दार आणि सुरेश बसवंतप्पा परगन्नावर अशी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे आहेत. सुरेश अंगडी यांनी गेल्या 16 वर्षाच्या आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये तसेच 2019 पासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री या नात्याने केलेले कार्य अमूल्य आहे.
त्यांनी बेळगाव जिल्हा नव्हे तर संपूर्ण कर्नाटकामध्ये रेल्वे वाहतूक अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आणि अनेक विकास कामांना चालना दिली आहे. यासाठी आम्ही स्वेच्छेने आमचे उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना पाठिंबा देत आहोत असे निवडणूक रिंगणातून माघार घेणाऱ्या उपरोक्त चौघा जणांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्यासह अन्य काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते असे सांगून यापैकी अशोक पंड्याप्पा हंजी, हणमंत शिवाप्पा नागनुर, बसवराज दुंडाप्पा हुद्दार आणि सुरेश बसवंतप्पा परगन्नावर या चौघाजणांनी स्वेच्छेने -स्वमर्जीने, कोणाच्याही दबावाखाली न येता आणि कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवार निवडून यावा या उद्देशाने श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले. तसेच निवडणूक रिंगणातून माघार घेणाऱ्या संबंधित चौघा जणांना धन्यवाद दिले आहेत.