बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवार दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदारांनी प्रथम आपले मतदार ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) देण्यात आली आहेत. या सर्वांनी आपापल्या भागातील मतदान केंद्राच्या ठिकाणी हे ओळखपत्र दाखवून मतदान करायचे आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नाही किंवा अद्याप मिळालेले नाही, अशा मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी पुढील कागदपत्रं सादर करता येतील.
1) आधार कार्ड, 2) मनरेगा जॉब कार्ड, 3) बँक अथवा पोस्टाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, 4) केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत आधार केलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, 5) ड्रायव्हिंग लायसन्स, 6) पॅन कार्ड, 7) एनपीआर अंतर्गत आरजीआयकडून मिळालेले स्मार्ट कार्ड, 8) भारतीय पासपोर्ट, 9) छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रं,
10) केंद्र /राज्य सरकार /पीएसयुएस /पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कामगारांना दिलेले सर्व्हीस आयडेंटिटी कार्ड अथवा 11) खासदार /आमदार /राज्यसभा सदस्यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र. निवडणूक मतदानासाठी बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी (बीएलओ) दिलेली फोटो होटर्स स्लीप ही अधिकृत ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य मानली जाणार नाही.