शहरातील आरपीडी क्रॉसनजीक एका वयोवृद्ध दाम्पत्याला अडवून त्यांची फसवणूक करून त्यांच्याजवळ असलेले लाखो रुपये किंमतीचे दागिने घेऊन भामट्यांनी पळ काढला आहे. रविवारी (दि. ४) दुपारी १.४० वाजता खानापूर रॉड वरील स्टार टॉवर या इमारतीनजीक झालेल्या या घटनेत सुमारे ४.७१ लाखांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
आरपीडी क्रॉसजवळ किराणा आणि इतर खरेदीसाठी सदर वयोवृद्ध दाम्पत्य आले होते. यादरम्यान आपण क्राईम डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे भासवून वयोवृद्ध दाम्पत्याला नजीकच एक खून झाल्याचे सांगण्यात आले. त्या दाम्पत्याकडे असणारे सोने जबरदस्तीने एका पिशवीत काढून ठेवण्यासाठी सांगण्यात आले.
घाबरलेल्या दाम्पत्याने लगेचच सोने पिशवीत ठेवले. आणि काही वेळानंतर सोन्याची शहानिशा करण्यासाठी पिशवी उघडून पाहण्यात आली, त्यावेळी त्या पिशवीतील सोने गायब झाले. आपण फसवले गेलो आहोत, हे काही वेळानंतर या दाम्पत्याच्या लक्षात आले. परंतु तोवर भामट्याने तेथून पळ काढला. सदर भामटा पल्सर वाहनावरून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १०६ ग्राम वजनाचे रुपये ४.७१ लाख रुपये किंमतीचे सोने घेऊन भामट्याने पळ काढला आहे.
आरपीडी क्रॉसनजीक झालेली हि पहिली घटना नसून आतापर्यंत अशा तीन घटना झाल्या आहेत. आपण अधिकारी असल्याचे भासवून किंवा सावजावर पाळत ठेऊन त्यांच्याजवळील सोने हिसकावून घेण्याचा प्रकार याठिकाणी सर्रास होत आहे.
या परिसरात झालेल्या अशा ३ घटनांची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या प्रकरणाचा तपास पोलीस घेत असून, या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, तसेच अशा लुटारूंचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.