राज्य सरकारने कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येचा धोका ओळखून पर्याय म्हणून नुकताच ‘नाईट कर्फ्यू’चा आदेश दिला होता. बुधवारपासून हा कर्फ्यू सुरू झाला आहे.
परंतु गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास अचानक बेळगाव शहरात आवश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.
पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी जाऊन अचानक व्यवसाय बंद करण्यासाठी सांगितले. यामुळे, व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. अचानकपणे पोलिसांच्या वाहनाचा सायरन शहरात वाजण्यास सुरुवात झाली आणि व्यावसायिकांमध्ये गोंधळ उडाला.
शहरातील खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्लीसह अनेक ठिकाणी पोलिस वाहनातून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येत होत्या. अवघ्या तासाभरातच संपूर्ण शहरात आवश्यक सेवा वगळता अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद केलेले दिसून आले.