Monday, January 6, 2025

/

‘खाऊ कट्टा’ येथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी

 belgaum

गोवावेस अर्थात श्री बसवेश्वर सर्कल नजीकच्या ‘खाऊ कट्टा’ याठिकाणी तात्काळ पिण्याच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून पाण्यासाठी नागरिकांची दिवसाढवळ्या सुरू असलेली लूट थांबवावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी नुकतेच उपरोक्त मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना सादर केले. सदर निवेदन स्वीकारून आयुक्ताने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गोवावेस सर्कलनजीक महापालिकेच्या गाळ्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘खाऊ कट्टा’ या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

गेल्या 27 मार्च रोजी सकाळी आपण या ठिकाणी भेट देऊन कांही खाद्यपदार्थ खरेदी करण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित स्टॉल धारकाने आमच्याकडे पिण्याचे पाणी नाही तुम्हाला हवे असल्यास बिसलरीची बाटली खरेदी करा असे उद्धटपणे सांगून पाणी देण्यास नकार दिला. प्यायचे पाणी नाही तर मग तुम्ही खाद्यपदार्थ कसे बनवता असा सवाल केला असता आम्ही बिसलरीची मोठी बाटली मागवतो असे त्या स्टॉलधारकाने सांगितले.

तसेच त्या बाटलीतील पाणी देण्यासही नकार देताना आपल्याकडे पाण्यासाठी ग्लास नाहीत असे त्याने सांगितले. या पद्धतीने याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे ज्यादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. बिसलरी बाटल्यांची विक्री करून दिवसाढवळ्या याठिकाणी ग्राहकांची लूट केली जात आहे.

तेंव्हा या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच या ठिकाणच्या स्टॉलधारकांचे परवाने तपासले जावेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथे सर्व नियमांचे पालन केले जात आहे की नाही? या ठिकाणची स्वच्छता आदी सर्व गोष्टींची तपासणी केली जावी. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जावी, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.