महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आता कोरोनाची दुसरी लाट कर्नाटकातही आली असून परराज्यातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेश मिळणार का? या प्रश्नावर उत्तर मिळाले आहे. महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात, कर्नाटकात कोणीही येऊ शकते. मात्र, प्रवेश घेणाऱ्यांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे सक्तीचे आणि बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी तपासणी नाक्याला गुरुवारी जिल्हाधिकारी हरिशकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात येईल. अन्यथा प्रवेश देण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे येथून ते अन्यत्र कोठे जाणार असतील तर त्याची माहिती प्रशासनाला देणेही बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. उलट आम्हीच परराज्यांना ऑक्सिजन पुरवठा करत आहोत. कमतरता भासू नये यासाठी लोकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. आमचे अधिकारी चांगले काम करत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली.
कोरोनाच्या नकली औषधांच्या विक्रीबाबत पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात जिल्हाभरात तपास सुरु आहे. डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तपास करण्यात येत आहे. बाजारपेठेतही तपास सुरु आहे असे त्यांनी सांगितले.