गावातील लोक, ग्रा. पं. सदस्य आणि ग्राम विकास अधिकारी यांच्यातील मतभेद मिटल्यामुळे तुरमुरी (ता. बेळगाव) गावातील ग्रामस्थ विशेषत: बेरोजगार महिलावर्ग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) पुनश्च कामाला लागला आहे.
महिलावर्ग कामाला लागण्याचे सर्व श्रेय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक अभिवृद्धी संघाला (एसएएस) जाते, ज्यांनी दोन्ही नाराज गटातील मतभेद दूर केले.
आता सुमारे 250 हून अधिक महिला नरेगा योजनेअंतर्गत तुरमुरी गावच्या 1.25 एकरमध्ये पसरलेल्या तलावातील गाळ काढून त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामात व्यस्त आहेत. या कामासाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च येणार आहे.
श्रमिक अभिवृद्धि संघाचे कार्यकर्ते राहुल पाटील यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, एक दिवस तुरमुरी गावातून जात असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की रोजगार नसल्यामुळे या गावातील बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तेंव्हा आम्ही एसएएसतर्फे या गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नरेगा योजनेचे फायदे गावकऱ्यांना समजावून देण्यास सुरुवात केली. प्रारंभी आमच्या बैठकांना 15 -20 महिला उपस्थित राहत होत्या. मात्र कालांतराने त्यांची संख्या वाढवून सुमारे 350 महिला बैठकीला हजर राहू लागल्या.
ग्रामपंचायत प्रशासनाने नरेगांतर्गत विकास कामे हाती घेऊन त्यात गावकऱ्यांना समाविष्ट करून घेतले होते. मात्र गेल्या तीन वर्षापासून गावकरी या योजनेमध्ये वर्षातील आठ ते दहा दिवसच काम करत होते. मात्र आता या योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस रोजगार पुरवण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे 1 एप्रिल पासून दैनंदिन रोजगार देखील 285 वरून 290 रुपये इतका वाढविण्यात आला आहे.
हे लक्षात घेऊन एसएएसने मध्यस्थाची भूमिका घेताना गावकरी आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्यातील मतभेद दूर करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे बेरोजगारांना आता रोजगार उपलब्ध झाला असून गावकरी विशेषत: महिलावर्ग सध्या गावच्या तलावातील गाळ काढून त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाला लागल्या आहेत, असे राहुल पाटील यांनी सांगितले.