शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी वापरलेल्या वह्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्याद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षतोडीचे प्रमाण थोडेफार का होईना घटविण्याच्या उद्देशाने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या एज्युकेशन फॉर नीडीतर्फे यंदापासून ‘बुक बँक’ (पुस्तक पेढी) ही संकल्पना राबविली जाणार आहे.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांची कन्या कु. राशी हिला ही बुक बँकची संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एज्युकेशन फॉर नीडीने पुढाकार घेतला आहे. कु. राशी सुरेन्द्र अनगोळकर ही ज्योती सेंट्रल स्कूलची विद्यार्थिनी असून ती इयत्ता 7 वीमध्ये शिकत आहे.
आपल्याला जिवंत राहायचे असेल तर झाडे जगवावी लागतील. वृक्षतोड थांबवून त्यांचे संरक्षण केले पाहिजे. कागद हा लाकडाच्या लगद्यापासून बनविला जातो. लाकडासाठी झाडांची कत्तल केली जाते. यासाठी जर आपण वापरलेली पाठ्यपुस्तक -वह्या पुनर्रवापरात आणल्यास कागदाची पर्यायाने लाकूड आणि वृक्षांची कांही प्रमाणात का होईना बचत होणार आहे. वृक्ष सुरक्षित राहणार आहेत.
यासाठीच एज्युकेशन फॉर नीडीतर्फे बुक बँकची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्याचा गरीब गरजू विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे.
तेंव्हा सदर संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शाळा महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आपली मागील वर्षाची पाठ्यपुस्तके आणि वह्या ज्या यावर्षी उपयोगाच्या नाहीत त्या आमच्याकडे जमा कराव्यात. तसेच अधिक माहितीसाठी 9880089798 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एज्युकेशन फॉर नीडीतर्फे करण्यात आले आहे.