Wednesday, December 25, 2024

/

फळविक्रीच्या नावाखाली गांजाविक्री करणाऱ्यांचा श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश

 belgaum

बेळगाव शहरात फळविक्रीच्या नावाखाली गांजाविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेहरुनगर दुसरा क्रॉस, येथील एका भाड्याच्या घरात गांजा विकणार्‍या दोघांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांनी पकडले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून त्यांच्या जवळून १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींवर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, फळ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी तिघांनी जुने घर भाड्याने घेतले होते. मात्र त्या घराचा वापर फळे ठेवण्यासाठी केला नाही. उलट अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी त्यांनी अड्डा थाटला होता. शनिवारी दुपारी नेहरुनगर येथील स्थानिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली होती. दुसरा क्रॉस, नेहरुनगर येथे फळविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये गांजा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नियाज शफिअहमद नायकवाडी (वय 38, रा. अशोकनगर), निकाब उर्फ निक्या दस्तगिरसाब पिरजादे (43 रा. अशोकनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर शाहनूर मेहबूबसमशी (रा. न्यू वैभवनगर) हा फरार झाला आहे.

श्रीराम सेनेचे कार्यकर्ते राहुल बडस्कर, संतोष पाटील, गणेश वाके, सतीश पाटील, अप्पू पुजारी, शिवा गावडे, किशोर येळ्ळूरकर, वसंत आनंदाचे आणि इतर कार्यकर्त्यांनी थेट घराचा दरवाजा ठोठावून त्यांना बाहेर बोलाविले. लोकवस्तीत गांजा विकून या परिसराचे नाव खराब करण्यात का येत आहे? याबाबत जाब विचारला. त्यावेळी निकाब व नियाज या दोघांची बोलती बंद झाली. आम्ही गांजा विकत नाही. कर्फ्यु असल्यामुळे मद्यपान करीत बसलो असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. फळाचा व्यवसाय करण्यासाठी घर घेतलेल्या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेऊन चोप दिल्याने प्रकरण उघडकीस आले.

खोलीत गांजाच्या पुड्या आढळून येताच कार्यकर्त्यांनी एपीएमसी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. युवकांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या दोघा जणांना ताब्यात घेऊन भाड्याच्या खोलीत शोध मोहीम राबविली असता १ किलो ८०० ग्रॅम इतका गांजा आढळून आला. या जोडगोळीजवळून एक मोटार सायकलही जप्त करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.