कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी रात्रीपासून येत्या 12 मेपर्यंत कर्नाटकात कोरोना कर्फ्यू लागू केला असला तरी मार्गदर्शक सूचीनुसार या कालावधीमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांना कामावर जाण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा बांधकाम आणि सार्वजनिक कामगार संघातर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा बांधकाम आणि सार्वजनिक कामगार संघाचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी राज्यात येत्या चार मेपर्यंत कर्फ्यूसह क्लोज डाऊन जारी करण्यात आला आहे. तथापि नव्या मार्गदर्शक सूचीनुसार या कालावधीत बांधकाम क्षेत्र सुरू राहणार आहे. इमारत व घराच्या दुरुस्तीला परवानगी देण्यात आली आहे.
मात्र सध्या शहरात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना कामावर जाणे कठीण झाले आहे. तसेच बहुतांश कामगार हे रोजंदारीवर काम करणारे असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी याकडे तात्काळ लक्ष देऊन बांधकाम कामगारांना त्यांच्या त्यांच्या कामावर जाण्यास आडकाठी आणली जाऊ नये, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. एन. आर. लातूर यांच्यासह सुजीत मुळगुंद, रोहित लातूर, ॲड. आर. पी. पाटील, ॲड. श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.