एसआयटी चौकशीच्या सुरुवातीलाच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना अटक करणे चुकीचे आहे, असे मत डीजी आणि आयजीपी प्रवीण सूद यांनी मांडले आहे.
कोरमंगल केएसआरपी परेड मैदानावर शुक्रवारी सकाळी पोलीस ध्वजदिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री पदकाने कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण सूद यांनी भाजपचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भात सुरु असलेल्या एसआयटी चौकशीसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले कि, एसआयटी निःपक्षपातीपणे कार्य करते. कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करणारी एसआयटी यंत्रणा नाही. रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य दिशेने तपास करून, आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल.
परंतु चौकशीच्या सुरुवातीला संशयितांना अटक करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. एसआयटी टप्प्याटप्प्याने चौकशी करत आहे. परंतु दररोज तपास कुठवर आला हे विचारणे देखील चुकीचे आहे. एसआयटीमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे एसआयटीच्या कामकाजावर आपला पूर्ण भरवसा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.