बेळगाव शहराची प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचे काम तात्काळ हाती घेऊन अंतिम मतदार यादी 21 मे रोजी प्रसिद्ध करावी असा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे. तेंव्हा एका प्रभागातील मतदारांची नावे दुसर्या प्रभागात टाकण्याची जी चूक करण्यात आली आहे ती प्रामुख्याने सर्वप्रथम दुरुस्त केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहराची प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचे काम तात्काळ हाती घेऊन अंतिम मतदार यादी येत्या 21 मे रोजी प्रसिद्ध करावी असा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे. यासाठी वेळापत्रक आखून देताना 28 एप्रिल ते 2 मे या काळात प्रभाग निहाय मतदार निश्चित करावेत. 3 ते 5 मे या काळात मतदार यादी छपाईसाठी दिली जावी. यादी छापून तयार झाल्यानंतर 6 ते 9 मे या काळात त्याची पडताळणी करून चुकांची दुरुस्ती करावी व सुधारणा करून पुन्हा ती छापून घ्यावी. 10 मे रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावी असे आयोगाने सांगितले आहे.
त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे 13 मेपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवून घेण्यास सांगण्यात आले आहे. दाखल झालेले आक्षेप 15 ते 17 मे या काळात निकालात काढावेत. त्यानंतर 18 ते 19 मे या काळात पुन्हा एकदा मतदार यादीची पडताळणी करून त्यातील त्रुटी दूर करून 21 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
मागील वेळी मतदार यादी तयार करताना एका मतदार संघातील जवळपास शेहेदिडशे लोकांची नांवे दुसऱ्या मतदारसंघात टाकण्याची चूक करण्यात आली आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या चुकीमुळे दुसर्या प्रभागाच्या मतदार यादीत ज्यांची नावे गेली आहेत अशा मतदारांना आपल्या मूळ प्रभागातील उमेदवाराला मतदान करता येणार नाही. याचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो. तेंव्हा सर्वप्रथम प्राधान्याने ही चूक दुरुस्ती केली जावी. चुकून दुसऱ्या प्रभागात ज्या मतदारांची नांवे गेली आहेत ती नांवे पूर्ववत त्यांच्या मूळ प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट केली जावीत.
याव्यतिरिक्त निवडणुकीप्रसंगी उमेदवारांच्या स्लीप घरोघरी पोहोचविण्याचे काम मतदानाच्या आठ दिवस आधी पूर्ण केले जावे. ज्यामुळे सर्व मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावता येईल.
नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीप्रसंगी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे बऱ्याच मतदारांना स्लीप मिळाली नसल्यामुळे त्यापैकी अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरली होती. याची पुनरावृत्ती महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत होणार नाही, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.