बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी /पोलीस उपायुक्त म्हणून लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची बदली बेंगलोर व्हीआयपी सेक्युरिटी विभाग (बेंगलोर निगम) येथे करण्यात आली आहे. आज (मंगळवारी दि. ६) डीसीपी यशोदा यांनी पदभार स्वीकारला आहे.
डीसीपी विक्रम आमटे हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील आहेत. त्यामुळे त्यांची बदली झाली आहे. पोलिस उपायुक्त यशोदा वंटगुडी यांनी यापूर्वी बेळगाव शहराच्या गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी काम केले आहे. डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी 4 मार्च 2019 ला गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाची सुत्रे स्वीकारली होती.
डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी अनेक गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देण्याबरोबरच वाहतूक विभागाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये त्यांची वैयक्तीक कारणासाठी बदली झाली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर नीलगार यांची बदली म्हैसूर राज्य गुप्तचर विभागात एसपी पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जागी म्हैसूर गुप्तचर विभागाचे मूत्तूराज एम. यांची नियुक्ती करण्यात आली होती. डीसीपी मूत्तूराज एम. यांनीही पदभार स्वीकरला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बेळगाव जिल्हा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.