Friday, December 27, 2024

/

कोविड नियंत्रण बैठकीत बीम्स संचालक गैरहजर; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरपूस समाचार!

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून सरकारी सुविधा असूनही नागरिक बीम्सकडे पाठ फिरवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती संदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत नेमके बीम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प गैरहजर असल्याने त्यांच्यावर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी चांगलेच भडकले.

महत्वपूर्ण बैठकीत बीम्स संचालक न दिसल्याने ते गैरहजर का आहेत? त्यांना तातडीने बोलवा अन्यथा अरेस्ट करा! अशा शब्दात उपमुख्यमंत्री संतापले. क्षणार्धात डॉ. विनय दास्तीकोप यांना बोलावणे धाडले आणि तातडीने डॉ दास्तीकोप बैठकीला हजर झाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचा चांगलाच समाचार घेतला.

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या अधिक असूनही रुग्ण बीम्समध्ये उपचारासाठी का येत नाहीत? याबाबत दास्तीकोप्प यांना विचारण्यात आले. सरकारी सुविधा असूनही बीम्सकडे नागरिक पाठ फिरवत आहेत. याबाबत स्पष्टीकरण विचारण्यात आले. बीम्सच्या कारभारावर असमाधान व्यक्त करून लवकरात लवकर हि परिस्थिती सुधारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

कोविड – १९ नियंत्रण, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर लसीच्या पुरवठ्यासंदर्भात जिल्हा पंचायत सभागृहात आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी होते. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच रेमडीसीवीर लसीचा पुरवठा आणि या लसीचा होणार काळा बाजार रोखण्यासाठी उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली कोविड नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणारी सर्व उपाययोजना करण्यात येईल. शिवाय लसींचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

रेमडीसीवीर लसींचा तुटवडा असल्याचे वृत्त हाती आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील लोकसंख्या ५० लाखांहून अधिक आहे. यामुळे लसींचा तुटवडा जाणवत आहे. परंतु यासंदर्भात येत्या दोन दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना लस पुरविण्यासाठी प्रयत्न सुरु असून लोकसंख्येनुसार लस उपलब्ध करण्यासाठी सहायक औषध नियंत्रण मंडल सूचना देण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीर औषधांचा पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीर औषधाचा पुरवठा करणे आणि त्यांचे दर आकारणे या गोष्टीवर औषध नियंत्रण मंडळाने नजर ठेवणे आवश्यक असल्याचे सवदी म्हणाले.Covid meeting

जिल्ह्यात रेमडीसीवीर औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे वृत्त आहे. लसींचा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती उपलब्ध होताच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकार खाजगी रुग्णालयांना रेमडीसीवीर लसींचा पुरवठा करत आहे. परंतु हि लस पुरविण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भात अनेक तक्रारी पुढे येत आहेत. यासंदर्भात सातत्याने निगराणी ठेवावी, असा सल्ला सवदींनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

याचप्रमाणे तालुकापातळीवर वाढणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांना पुरविण्यात येणारी बेड सुविधा, इतर आरोग्य सुविधा, बेडची क्षमता, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय उपकरणे, कर्मचारी, रुग्णवाहिका व इतर उपकरणे तयार ठेवावी, आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक ती सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी, अपर जिल्हाधिकारी योगेश्वर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.