Friday, October 18, 2024

/

….अन् कोरोनाला नमवण्यासाठी यांचाही लागतोय हातभार

 belgaum

कोरोनाची दुसरी लाट आणि कर्फ्यूमुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी आता कांही बिगर सरकारी संघटना (एनजीओ) आणि जनाधारित गटांनी अर्थात ग्रुप्सनी पुढाकार घेतला आहे. या ग्रुपपैकी काहींचे काम नियोजनबद्धरित्या सुरू असून विभिन्न पार्श्वभूमी असणारे सर्वजण संघटित होऊन गटागटाने विविध मार्गाने जनसेवा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्वांनी आपापले ऑनलाइन ग्रुप केले आहेत.

‘कोविड -19 रिस्पॉन्स बेळगाव’ हा व्हाट्सअप ग्रुप सरकारी अधिकारी आणि धोरण ठरविणाऱ्यांमधील संपर्क प्रणाली स्थापन करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांसह आरोग्य विभाग तसेच अन्य सरकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा ग्रुप सरकारी परिपत्रके आणि आदेश प्रसारित करण्याबरोबरच त्यांची तात्काळ अंमलबजावणी होईल या अनुषंगाने अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधतो.

‘कोरोना -19 सिटीझन रिस्पॉन्स बेळगाव ग्रुप’ या ग्रुपमध्ये परोपकारी नागरिकांसह एनजीओचे सदस्य, स्वयंसेवक आणि तज्ञांचा समावेश आहे. विवेक कोईलो हे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ या ग्रुपमधील उपक्रमांचे समन्वयक आहेत. या ग्रुपद्वारे औषध व इंजेक्शन यांचे नियमन केले जाते. सध्या औषध व इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत विचारणा करणाऱ्यांना आम्ही उत्तरे देत आहोत. यासाठी आम्ही नजीकच्या औषध दुकानदार किंवा अधिकाऱ्यांना औषध व इंजेक्शन घरपोच पाठविण्याची व्यवस्था करण्याबाबत सांगत आहोत, असे ग्रुपचे सदस्य सहाय्यक औषध नियंत्रक रघुराम निडवंडा यांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायीक आणि एनजीओ सदस्य असणारे किरण निप्पाणीकर म्हणाले की, अन्नपुरवठाची विचारणा करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही हॉटेल्स आणि केटरर्स यांचे एक नेटवर्क तयार करत आहोत. बेळगाव शहरात शिक्षणासाठी परगावचे असंख्य विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असणाऱ्या या विद्यार्थ्यांना आम्ही एक तर मोफत अथवा ना नफा ना तोटा तत्त्वावर शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करण्याचा विचार करत आहोत, असे निप्पाणीकर यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक हितेश धर्मादासानी, डाटा सर्व्हिस पुरवणारे अजित पाटील आणि प्रसार माध्यम व्यवसायिक उदय किंजवाडकर यांनी कोरोनासाठी सध्या प्रत्यक्षात शहरातील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड्स आणि ऑक्सिजन यांची माहिती देणारे https://covid.allaboutbelgaum.com हे पोर्टल सुरू केले आहे. आम्हाला शहरातील हॉस्पिटल्सकडून आवश्यक डाटा (माहिती) स्वेच्छा सादर केली जात आहे. आरोग्य खात्याने देखील बेड्स आणि ऑक्सिजनसंदर्भात रोजच्या रोज माहिती देण्याचे वचन दिले आहे, अशी माहिती किंजवाडकर यांनी दिली. सध्या या पोर्टलकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या शहरातील सुमारे 25 हॉस्पिटलची माहिती उपलब्ध आहे.

‘फेसबुक फ्रेंड्स सर्कल’ हादेखील प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्य करणारा ग्रुप आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव काळात समाजसेवेत सक्रीय राहिलेला हा ग्रुप यावेळी देखील 12 ऑक्सीजन सिलेंडर्स, 4 पल्स ऑक्सिमीटर किट, एक हॉस्पिटल बेड आणि एक व्हिलचेअर या साधनांसह कोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त आहे. विशेष करून रक्तदानामध्ये फेसबुक फ्रेंड्स सर्कल (संपर्क क्र. 9986809825) अग्रेसर असून या ग्रुपकडे 5 हजारहून अधिक रक्तदात्यांची फौज आहे. या ग्रुपने आत्तापर्यंत 17,000 फेसमास्कचे मोफत वाटप केले आहे. व्यवसायाने कार्पोरेटर ट्रेनर असणारे संतोष दरेकर या ग्रुपचे नेतृत्व करतात. डॉ. समीर शेख, डॉ. देवदत्त देसाई, डॉ. आनंद तोट्टगी, प्रशांत बिर्जे, भरमा कोळेकर, कादिम बेपारी, शहाबुद्दीन बॉम्बेवाले व सुरज अणवेकर हे या ग्रुपचे सदस्य आहेत.

आणखीन एक ग्रुप आहे ज्याचे नांव ‘कोविड सपोर्ट बेळगाव ग्रुप’ असे आहे. जो कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कालावधीतही कार्यरत होता. या ग्रुपमध्ये बेळगाव शहरातील एनआयआर डॉक्टर्स, एनजीओ सदस्य आणि काम करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. कोरोनाच्या किरकोळ आणि सौम्य लक्षणांसाठी डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला उपलब्ध करून देणे, ऑक्सीजन व औषध पुरवठा, वैद्यकीय तपासणी, प्लाझ्मा थेरेपी, ऍम्ब्युलन्स आणि अंत्यसंस्कार या सेवा सदर ग्रुपकडून पुरवल्या जातात. आम्ही सलग 24 तासासाठी हेल्पलाइन (18001022716) स्थापित केली आहे आणि आमच्या सर्व सेवांच्या उपलब्धतेचे केंद्रीकरण केले आहे, अशी माहिती या ग्रुपचे सदस्य मुदस्सर तेरणीकर यांनी दिली. डॉ कुमेल सय्यद, नबील घाडी, नदीम अत्तार, समीर नाईक, मकसूद पुणेकर, सैफ मेनन, एनजीओ सदस्य फईम माडीवाले आणि मुदस्सर तेरणीकर हे या ग्रुपचे सदस्य आहेत. हा ग्रुप अल -इक्र, खादीमीन आणि अंजुमन -इ -इस्लाम या शहरातील एनजीओंच्या सहकार्याने कार्य करतो.

हेल्प फॉर नीडी आणि फूड फॉर नीडीच्या माध्यमातून सुरेंद्र अनगोळकर हे सातत्याने अंतिम संस्कार करण्यास मदत व रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत मागील वर्षी पासून कोरोना काळात त्यांच्या कामाचा धडाका सुरूच आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.