देशभरात लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्यावर कोरोना बाधितांच्या हातावर कोविडचा शिक्का मारणे बंद करण्यात आले होते. कर्नाटकात कोरोना बाधित रुग्णांच्या हातावर आता पुन्हा हा शिक्का मारण्यात येणार आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन बेंगलोरमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या सार्वजनिक ठिकाणी फिरणार्यावर बंदी घालण्यासाठी त्यांच्या हातावर कोविड -19 चा शिक्का मारला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉक डाऊन जाहीर करून वैद्यकीय उपचार देण्यात येत आले होते. परंतु त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने होम कॉरंटाईन सुरू करून घरीच वैद्यकीय उपचाराला सुरुवात करण्यात आली.
- शिवाय रुग्णांना घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी हातावर शिक्का मारला जायचा. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाधितांची संख्या घटल्यामुळे लॉक डाऊन शिथील करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास घातलेले निर्बंध मागे घेण्यात आले. परंतु गेल्या मार्चपासून बाधितांच्या आकड्यात परत वाढ झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध पुन्हा जारी करण्याचे आदेश बजावण्यात आले असून कोरोना बाधित रुग्णांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येऊ नये या उद्देशाने हातावर शिक्का मारण्यास सुरुवात केली जाणार आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबतची माहिती दिली असून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत. यामुळे येत्या दोन दिवसात याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.