कोरोनाग्रस्त मनोरुग्णाला उपचार न करताच बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून बाहेर सोडण्यात आल्यामुळे या हॉस्पिटलचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या मनोरुग्णाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका मनोरुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर उपचार करणे आवश्यक असताना उपचार न करता त्याला बाहेर सोडण्यात आले. त्यामुळे सदर मनोरुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर रस्त्याकडेला पदपथावर आजारी अवस्थेत झोपून होता. याबाबतची माहिती मिळताच श्रीराम सेने हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच त्या मनोरुग्णाची विचारपूस करून त्याला आपल्या रुग्णवाहिकेतून संपूर्ण उपचारासाठी पुन्हा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यासाठी श्रीराम सेन हिंदुस्तानचे शंकर पाटील, सुदेश लाटे, प्रणव किल्लेकर, आदित्य रजपूत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांनी परिश्रम घेतले.
एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोक डाऊन करण्यात आला आहे या परिस्थितीत कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार करून त्याला कांही दिवस काॅरंटाईन करणे आवश्यक असताना संबंधित मनोरुग्णाला अर्धवट उपचार करुन वाऱ्यावर सोडण्यात आल्याने बेळगाव सिव्हील हॉस्पिटलच्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.