देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांसहित कर्नाटकातही कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आज बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून १८८ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यासह जिल्ह्याची एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २८६९० इतकी झाली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची नवनवीन लक्षण समोर येत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.
जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी अशी आहे :
आजपर्यंत एकूण व्यक्तींची पाहणी करण्यात आलेली संख्या : ६३१८५४
रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल झालेल्या एकूण रुग्णांची संख्या : ८५७
कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेल्या रुग्णांची संख्या : ६३०७६०
एकूण मृतांची संख्या : ३५३
कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या : २७४८०
सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या : ८५७
आज नव्याने आढळून आलेल्या १८८ रुग्णांपैकी अथणी तालुक्यातील १७, बेळगाव तालुक्यातील ९९, बैलहोंगल तालुक्यातील ८, चिकोडी १२, गोकाक १६, हुक्केरी ४, खानापूर ९, रामदुर्ग ४, रायबाग १४, सवदत्ती ३, आणि इतर २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाची नवी लक्षणे काय आहेत? जाणून घ्या…
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काही नवी लक्षण पाहायला मिळत आहे. यात तोंड कोरडे होणे, घसा दुखणे, जीभ कोरडी पडणे, जीभ पांढरी पडणे किंवा त्यावर पांढरे डाग दिसणे या लक्षणांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ही लक्षण दिसू लागतात. यातील तोंड कोरडं पडणे हे प्रमुख लक्षण आहे. याला जेरोस्टोमिया असे म्हटलं जाते. यानंतर त्या रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे जाणवू लागतात. तसेच कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडू शकते. यामुळे तोंडात लाळ निर्माण होण्यावर परिणाम होतो. ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून येतात, त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण नीट चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षण जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.