गेल्या कांही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याने बेंगलोर, मुंबई आणि पुणे येथे नोकरी अथवा शिक्षणानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या बेळगावसह अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष करून विद्यार्थ्यांनी आपल्या मूळगावी परतीच्या स्थलांतराला सुरुवात केली आहे.
राज्यात गेल्या मंगळवारी रात्रीपासून 14 दिवसांचा लॉक डाऊन सारखा निर्बंध जारी करण्यात आल्यामुळे बेंगलोर, मुंबई आदी ठिकाणाहून लोक मोठ्या संख्येने बेळगांव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, हुबळी -धारवाड तसेच इतर जिल्ह्यांमध्ये असलेल्या आपल्या मूळगावी परतू लागले आहेत. परगावात वास्तव्यास असणारे हे सर्व लोक खाजगी वाहने, रेल्वे वगैरेंच्या सहाय्याने गेल्या कांही दिवसांपासून परतीचे स्थलांतर करत आहेत.
कोरोना प्रादुर्भाव थोपविण्यासाठी बेंगलोर आणि शेजारील महाराष्ट्र राज्यातील अनेक खाजगी कंपन्या आणि संस्थांनी यापूर्वीच ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे दरम्यान राजधानी बेंगलोर येथील हॉटेल, रेस्टॉरंट आणि विविध अन्य व्यवसायांमध्ये कार्यरत असणारे मोठे मनुष्यबळही आपापल्या घरी परतू लागले आहे. तथापि कोरोनाग्रस्त बेंगलोर येथून मोठ्या प्रमाणात परतीचे स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे येत्या कांही दिवसात राज्याच्या अन्य भागात विशेष करून ग्रामीण भागातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बेळगावचे जिल्हाधिकारी डाॅ. के. हरीशकुमार यांनी बेंगलोर आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक बेळगाव शहरासह जिल्ह्यात परतत असल्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे माघारी परतणाऱ्या लोकांमधील रोगाची लक्षणे असणाऱ्यांना शोधून काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून प्रत्येकाची कोरोना तपासणी केली जात आहे. याच पद्धतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात देखील प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेळगावात दररोज सुमारे 5000 लोकांची कोरोना तपासणी केली जात असून असुरक्षित भागांमध्ये कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जाईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे. निर्बंध आणि उपाय योजना अधिक कठोर करण्यात आल्यामुळे बेंगलोर वगळता राज्यातील अन्य भागांमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली येण्यास मदत होईल, असे मत देखील जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी व्यक्त केले आहे.
बेंगलोर आणि महाराष्ट्राच्या कांही भागातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली असून खाजगी वाहने अथवा रेल्वेने मोठ्या संख्येने बेळगाव व्यक्ती प्रवेश करणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. माघारी परतणाऱ्या स्थलांतरितांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जात आहे असे सांगून बंगलोर येथून माघारी परतणाऱ्याकडे कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे बंधनकारक नसल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले.
संपूर्ण राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत 50 टक्क्याहून अधिक बाधित रुग्ण खुद्द बेंगलोर शहर परिसरातीलच असल्यामुळे तिथे काम करणारी आणि शिक्षण घेणारी मंडळी भीतीने आपापल्या मूळगावी परतू लागली आहेत. गेल्या 28 एप्रिल रोजी राज्यातील एकूण 39057 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी धोक्याची सूचना देणारे तब्बल 22,596 रुग्ण बेंगलोर शहरी जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत.