कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील पाऊल उचलले आहे. त्यानुसार आजपासून सुरू झालेल्या बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या रचनेत बदल करण्यात आला असून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ती एक सोडून एक अशी खुली ठेवण्यात आली आहेत.
कोरोनाला थोपविण्यासाठी राज्य सरकार विविध उपाय योजनांद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे.
त्याअनुषंगाने आता बेळगाव एपीएमसी प्रशासनाने देखील पाऊल उचलले असून एपीएमसी भाजी मार्केटमधील दैनंदिन व्यवहाराच्या पद्धतीत बदल केला आहे. कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे एपीएमसी भाजी मार्केटमधील सर्वच्या सर्व दुकाने यापुढे खुली राहणार नाहीत. त्याऐवजी भाजी मार्केटमध्ये असणारे दुकान गाळे एक सोडून एक अशा पद्धतीने खुले राहणार आहेत. ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होणार आहे.
मात्र सध्या या भाजी मार्केटमध्ये 100 दुकान गाळे या पद्धतीने सुरू करण्यात आले असून कोणाच्या नांवावर कोणता दुकान गाळा आहे याची यादी एपीएमसीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित भाजी विक्रेत्यांना या भाजी मार्केटमधील नव्याने बांधण्यात आलेले 40 दुकान गाळे तसेच या ठिकाणचा कट्टा आणि संडे मार्केट परिसर भाजी खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुकान गाळे एक सोडून एक खुले ठेवण्याची ही योजना यापूर्वी देखील राबविण्याचा प्रयत्न झाला होता.
मात्र त्यावेळी पुरेशे दुकान गाळे उपलब्ध नसल्यामुळे तसेच रस्त्याची ही चांगली सोय नसल्यामुळे सदर योजना बारगळली होती. तथापि आता एपीएमसी भाजी मार्केट मध्ये पुरेसे दुकानगाळे नव्याने बांधण्यात आलेले दुकान गाळे आणि संडे मार्केटचा परिसर उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणच्या रस्त्यांचे देखील आता व्यवस्थित काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे एक सोडून एक दुकान सुरू ठेवण्याची योजना यावेळी यशस्वी होईल असा विश्वास व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.