कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या कालावधीत बेळगावला येणाऱ्या अपंग, वृद्ध आणि आजारी प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्प फॉर नीडी संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकीतून ऑटोरिक्षा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेळगाव रेल्वे स्थानक येथे ही सेवा संबंधितांसाठी 24 तास उपलब्ध आहे.
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने काल बुधवार 21 एप्रिलपासून बेळगावसह कर्नाटकात नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. संचार बंदीच्या या आदेशाची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने परगावाहून विशेष करून रात्री बेळगावला येणाऱ्या प्रवाशांपैकी अपंग वृद्ध आणि आजारी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
कर्फ्यू अर्थात संचार बंदीमुळे संबंधित प्रवाशांच्या घरच्या लोकांनाही रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचणे अवघड जाणार आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपताना सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या हेल्प फॉर नीडी या सेवाभावी संघटनेतर्फे बेळगाव रेल्वे स्थानकावर 5 ऑटोरिक्षा संबंधित प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या ऑटोरिक्षांद्वारे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या परगावच्या वृद्ध, अपंग आणि आजारी प्रवाशांना त्यांच्या -त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. ही ऑटोरिक्षा सेवा वृद्ध, अपंग आणि आजारी प्रवाशांसाठी मोफत असणार असून सर्वसामान्य प्रवाशांना माफक रिक्षा भाडे आकारले जाणार आहे.
ऑटोरिक्षाचा हा सेवाभावी उपक्रम सुरेंद्र अनगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑटोरिक्षा चालक गौतम कांबळे (ऑटो नं. केए 22 सी 3501, परमिट नं. 6213, मो. क्र. -9980002277) यांच्या नेतृत्वाखाली राबविला जात आहे. तसेच या उपक्रमामध्ये मेहबूब शहापूरकर (ऑटो नं. केए 22 सी 9383, परमिट नं. 7506), शब्बीर दड्डी (ऑटो नं. केए 22 सी 1484, परमिट नं. 5873), सलीम एम. शेख (ऑटो नं. केए 22 बी 1770, परमिट नं. 2029), शदाब मारीहाळकर (ऑटो नं. केए 22 बी 0885, परमिट नं. 1281) आणि यासीन काची (ऑटो नं. केए 22 सी 2097, परमिट नं. 8194) या ऑटोरिक्षा चालकांचा सहभाग आहे.
हे सर्व ऑटोरिक्षा चालक नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी आणि वीकेंड कर्फ्यू समाप्त होईपर्यंत 24 तास आपली ऑटोरिक्षा सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध ठेवणार आहेत. तेंव्हा शहरातील नागरिकांनी रेल्वेने बेळगावला येणाऱ्या परगावच्या आपल्या नातलगांना याची माहिती देऊन सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.