परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील बससेवा ठप्प झाली असून याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक घेत आहेत.
जनतेकडून जादा पैशांची आकारणी करण्यात येत असून, प्रमाणापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या खाजगी वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे.
बेळगावमध्ये मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या ९ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परंतु परिवहन कर्मचारी अजूनही हट्टाला पेटले आहेत. इतका हट्ट योग्य नाही.
या हट्टामुळे जनतेचे आणि सरकारचेही नुकसान होत आहे. याचाच गैरफायदा खाजगी वाहतूकदार घेत असून जनतेकडून जादा दर आकारण्यात येत आहे. हा संप मागे घेण्यासाठी आम्ही परिवहन कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे. परंतु हा संप जाणीवपूर्वक, स्वार्थासाठी करण्यात येत असून दोन दिवसात हा संप मागे घेण्यात आला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अद्याप ‘एस्मा’ लागू करण्याबाबत निर्णय झाला नसून यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, परिवहन संपाचा गैरफायदा खाजगी वाहतूक संस्था घेत असून जनतेला अधिक दराचा फटका बसत आहे.
जनतेची बस वाहतूक ठप्प असल्याने मोठी गरसोय होत असून पर्यायी व्यवस्था म्हणून जनता खाजगी वाहतुकीकडे वळत आहे. परंतु खाजगी वाहतूकदार प्रमाणापेक्षा अधिक दर आकारात असल्याची माहिती समोर आली असून, जनतेला अशापद्धतीने लुटणाऱ्या खाजगी वाहतूकदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.