बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लोकसभा निवडणुकीत शुभम शेळके यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे हे होते.
सीमाभागात युवा नेतृत्व म्हणून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीमाभागात मराठी माणसांवर होणारे अन्याय, अत्याचार, दडपशाही या विरोधात आवाज उठविणे आणि कर्नाटक सरकारला मराठीची ताकद दाखवून देणे, हे आपले उद्दिष्ट्य असून शुभम शेळके यांना लोकसभा निवडणुकीत बहुमताने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उपस्थितातून करण्यात आले.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, शिवाजी हांडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.