चार पाच कार्यकर्ते आणि समोर हात जोडलेला उमेदवार. मताची याचना,पायधरणी आणि आश्वासने, मतदारांकडूनही मनात नसताना हो हो तुम्हालाच मत घालू असे उत्तर. हे सारं प्रचारात सुरू असताना बघायला मिळतं. पण सिंह समितीच्या प्रचारयात्रा नव्हे तर विजय यात्रा ठरू लागल्या आहेत.
लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेले शुभम शेळके यांना लोक अक्षरशः विजयी उमेदवारासारखी वागणूक देत आहेत यामुळे लाखो मते पडणार हे निश्चित असून समितीच्या सिंहाचा नैतिक विजय केंव्हाच झाला आहे.
युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपली उमेदवारी भरतानाच स्पष्ट केले होते की अन्यायावर वाचा फोडण्यासाठी मराठी भाषिकांची एकजूट करणे हाच माझा उद्देश आहे. त्यांच्या उमेदवारीच्या रूपाने ही एकजूट पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय पक्षात गेलेला सुद्धा मराठी भाषिक सन्मानाने वागवला गेला पाहिजे तो फक्त रस्त्यावरचे फलक लावण्या आणि काढण्यापूरता नसावा हे आपले ध्येय आहे. यासाठी पहिल्यांदा मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांना आपली ताकद दाखविल्याशिवाय ते शहाणे होणार नाहीत. आज आवाज जरी उठविला तरी पोलिसांचे फोन येतात, ही दादागिरी खपवून घ्यायची नसेल तर एक व्हा आम्ही एकजुटीने राहूया असे शुभम यांचे आवाहन मराठी माणसाच्या हृदयात घर करत आहे.
शुभम यांना लोक स्वतःहून आपली गल्ली आणि विभागात बोलवत आहेत. मते देण्यासाठीची खात्री देत आहेत. पळापळ आणि खर्चाला पैसे देत आहेत. विशेष म्हणजे आया बहिणी त्यांना ओवाळतात आणि त्यांच्या विजयाची नांदी घडते. जोडीला फटाक्यांची जोरात आतषबाजीही होते. यामुळे समिती संपली आणि आम्ही संपविली म्हणणाऱ्या राजकारणातल्या कलुशा कबजी ची सध्या पाचावर धारण बसत आहे.
बेळगाव ग्रामीण भागातील उत्सुर्त प्रतिसादानंतर बेळगाव शहरातही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शुभम शेळके आगे बढो हम तुम्हारे साथ है ची घोषणा बेळगाव शहराच्या गल्ली गल्लीत ऐकायला मिळत आहे. समितीने मध्यवर्ती बेळगावातली आपली विभागलेली मते एकगठ्ठा सिंहाला देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शुक्रवारी शुभम यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांनी समितीचे सर्व गट एकत्र आले आहेत. सर्व प्रमुख गल्ल्यांनी शुभम यांचे हात बळकट करण्याची शपथच घेतली आहे.