बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. बेळगाव शहरातील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात सदर मतमोजणी होणार असून २ मे रोजी सकाळी ८ वाजता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
या मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी कोविड निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी योगेश्वर एस. यांनी सांगितले.
मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार, अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांच्यासहित इतर सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी कोविड निगेटिव्ह अहवाल असणे अनिवार्य आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश घेण्यापूर्वी सदर अहवाल स्वतःसोबत आणणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने २७ मे रात्री ९ पासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जरी केला आहे. पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि एजंटना वाहन ओळखपत्र देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, एजंटना सदर पास मतमोजणी केंद्रात प्रवेश घेण्यापूर्वी दाखविणे गरजेचे आहे.
वाहन ओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना, एजंटना केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. नियोजित ठिकाणीच वाहन पार्किंग करणे आवश्यक असून चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी योगेश्वर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.