कोरोना नियंत्रणासाठी विजापूर व बागलकोटसह बेळगाव जिल्ह्याकरिता नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्थात एडीजीपी भास्कर राव यांनी आज सकाळी बेळगाव शहरात फेरफटका मारून फेस मास्कचे वितरण करण्याबरोबरच कोरोना संदर्भात जनजागृती केली.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार बरोबर आता पोलीस प्रशासन आणि देखील पुढाकार घेतला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी आपल्या हाताखालील वरिष्ठ स्तरावरील 7 पोलीस अधिकाऱ्यांना राज्यातील जिल्हे विभागून दिले आहेत. यापैकी बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्याचे नोडल अधिकारी असणारे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) भास्कर राव हे आज सकाळी बेळगावात दाखल झाले आहेत.
बेळगावात येताच राव यांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त मुथ्थूराजू, यशोदा वंटगुडी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, एसीपी सदाशिव कट्टीमनी, नारायण बरमणी, केएसआरपी कमांडंट हमजा हुसेन आदी स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीनंतर उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत एडीजीपी भास्कर राव यांनी शहरात पायी फेरफटका मारून कोरोना संदर्भात जनजागृती केली.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून एडीजीपी भास्कर राव यांनी आपल्या फेरफटक्याला सुरुवात केली. त्यानंतर काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे त्यांच्या फेरफटक्याची समाप्ती झाली. यादरम्यान भास्कर राव यांनी रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांना थांबून कोरोनाचा धोका समजावून दिला. तसेच त्यांना फेस मास्कचे देखील वितरण केले. त्याचप्रमाणे ठीकठिकाणी त्यांनी दुकानदारांच्या भेटी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी बाबत मार्गदर्शन केले.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणावयाचा आहे. तेंव्हा जनतेशी मित्रत्वाने वागा. अरेरावी अथवा दंडेलशाही न करता लोकांना कोरोनाचा धोका नीट समजावून सांगा. मित्रत्वाने त्यांच्याकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून घ्या, असा सल्ला यावेळी बेळगावचे माजी पोलिस आयुक्त म्हणून सेवा बजावलेल्या एडीजीपी भास्कर राव यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त मुथ्थूराजू, यशोदा वंटगुडी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, एसीपी सदाशिव कट्टीमनी, केएसआरपी कमांडंट हमजा हुसेन आदी अधिकारी उपस्थित होते.