कोरोना प्रादुर्भावाची वाढती तीव्रता आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेली नवी मार्गदर्शक सूची लक्षात घेऊन बेळगाव शहरात 3 ठिकाणी भाजी मार्केट व बाजार भरविण्याचा निर्णय झाला आहे.
सीपीएड मैदान, ऑटोनगर येथील आरटीओ मैदान आणि कंग्राळी खुर्द येथील सर्वे क्रमांक 62 मधील दोन एकर खुली जागा याठिकाणी भाजी मार्केट व बाजार भरणार असून त्यांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. के. हरीशकुमार यांच्या आदेशावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. सदर तीनही ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने तीन पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक पथकात सात सदस्यांची नियुक्ती केली आहे. सदर पथकाकडे भाजी मार्केट व बाजाराची जबाबदारी देण्यात आली असून त्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी या पथकांना घ्यावी लागणार आहे. शहरातील तीनही भाजी मार्केटसाठी समन्वय अधिकारी म्हणून महापालिकचे कार्यकारी अभियंते ई. गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार व रविवारी वीकेंड लॉक डाऊन असल्यामुळे सोमवारपासून या तीनही ठिकाणी भाजी मार्केट व बाजार सुरू होणार आहेत.
क्लब रोडवरील सीपीएड मैदानावरील बाजाराची जबाबदारी महापालिकेचे फलोत्पादन विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बाहुबली चौगुला यांच्याकडे असून त्यांना मदतीसाठी सहा कर्मचारी देण्यात आले आहेत. ऑटोनगर येथील बाजाराची जबाबदारी महापालिकेच्या दक्षिण विभाग 1 ते सहाय्यक कार्यकारी अभियंता सुरेश मुर्तेंणावर यांच्याकडे असून त्यांच्यासोबत सहा कर्मचारी असतील.
कंग्राळी मुख्य रस्त्यावरील बाजाराची जबाबदारी महापालिकेचे सहाय्यक नगररचना अधिकारी अशोक गदग यांच्याकडे असून त्यांना देखील सहा जण मदतीला असतील. यामुळे आता शेतकऱ्यांना आपली कृषी उत्पादने, भाजीपाला व इतर माल घेऊन या तीन ठिकाणी जावे लागणार आहे.