बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी सीमाभागातील मराठी भाषिकांची अधिकृत उमेदवार म्हणून शुभम शेळके यांचे नांव घोषित केल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेनेच्या कार्यालयामध्ये उमेदवार शुभम शेळके यांचा सन्मान करून त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोषी स्वागत करण्यात आले.
बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह शिवसेनेच्या के. पी. पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी भाषिकांचे अधिकृत उमेदवार म्हणून शुभम शेळके यांचे नाव निश्चित करण्यात आल्यामुळे पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन शेळके यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह संघटक दत्ता जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवार शुभम शेळके आणि माघार घेतलेले के. पी. पाटील यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. याप्रसंगी शिवसेना आणि समितीच्या जयजयकाराच्या तसेच बेळगाव बिदर भालकी निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना केव्हा एकत्र येणार याची समस्त मराठीभाषिक वाट पाहत होते आणि आता ते घडले आहे. म. ए. समिती व शिवसेना एकत्र आले आहेत, आणि त्यांचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके आहेत. त्यांना आपल्याला प्रचंड मतांनी निवडून आणावयाचे आहे असे सांगून आपण सर्वांनी एक दिलाने एका झेंड्याखाली राहून काम करूया आणि सीमाभागातील मराठी भाषिकांची काय ताकद आहे हे ते दाखवून देऊया असे शिरोळकर म्हणाले.
शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव म्हणाले की, गेल्या 16 मार्च रोजी निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत मराठी माणूस एका झेंड्याखाली यावा यासाठी आम्ही एक दिलाने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना आज कुठेतरी यश आले आहे असे मला वाटते. शिवसेना या निवडणूक रिंगणात उतरणार नव्हती. शेवटपर्यंत आम्ही शुभम शेळके यांच्यासाठी प्रयत्न केला होता.
शुभम शेळके यांना विजयी करण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल असे दत्ता जाधव यांनी स्पष्ट केले. के. पी. पाटील यांनी मी समितीच्या आणि मराठी भाषिकांच्या हितासाठी माझी उमेदवारी मागे घेऊन शुभम शेळके यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेचे म्हणजेच समस्त मराठी भाषिकांचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांनी नेहमीप्रमाणे या वेळी आपले परखड विचार व्यक्त केले. मी कधीच या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक नव्हतो. मात्र आमच्या बैठकीत निर्णय झाला की करनाटकी पोलिसांना हाताशी धरून मराठी माणसांवरील अन्यायाचा वरवंटा फिरवणाऱ्यांना जाब विचारणे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा आम्ही ठरविले. जे झाले ते झाले. मी मागे देखील बोललो होतो शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याप्रमाणे आपल्याला लढायचे आहे. खास करून दत्ता जाधव आणि के. पी. पाटील यांचे मी आभार मानतो त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली नाहीतर या लढ्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. तेंव्हा आता आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून स्वतःला उमेदवार समजून लढायचे आहे. योगायोगाने नियतीचा खेळ म्हणावा की ‘सिंह’ हे चिन्ह हे एकेकाळी समितीचे वैभव होते ते वैभव आपल्याला परत आणावयाचे आहे. यासाठी आजपासून कंबर कसून कामाला लागूया. समितीला तिचे जुने वैभवाचे दिवस दाखवताना दिलेश्वरांना मात्र धडकी भरल्याशिवाय गप्प बसायचे नाही असे सांगून परिणाम कांहीही होऊ देत राष्ट्रीय पक्षाचा घाम काढणे हे आमचे एकमेव ध्येय राहणार आहे, असे शेळके यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी शिवसेनेचे राजकुमार बोकडे, दिलीप बैलुरकर, प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, मदन बामणे, बंडू केरवाडकर आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना कार्यालय तसेच नजीकच्या रंगुबाई पॅलेस येथे असणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून शुभम शेळके यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.