होळीच्या पाचव्या दिवशी अनेक ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. बेळगावमध्ये शहापूर भागात आजच्या दिवशीच रंगोत्सव साजरा केला जातो.
यामुळे रंगपंचमीच्या औचित्याने कै. नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने आज काशीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वैविध्यपूर्ण असा फुलांच्या पाकळ्यांच्या माध्यमातून अनोखा रंगोत्सव साजरा करण्यात आला. हा उपक्रम साजरा करण्याचे या प्रतिष्ठानचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
केमिकल युक्त रंगांच्या माध्यमातून सध्या रंगपंचमी साजरी केली जात आहे. या रंगांमुळे डोळ्याला आणि त्वचेला इजा होण्याचे प्रकार वाढले आहेत. यादृष्टिकोनातून पाकळ्यांच्या माध्यमातून रंगोत्सव साजरा करण्याची कल्पना कै. नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने अंमलात आणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कै. नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस इन्स्पेक्टर राघवेंद्र हवालदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे नेताजी जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच प्रत्येकाने या उपक्रमाचे स्वागत करून या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मराठा जागृती संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, मनसेचे रवी साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर, प्रभाकर भकोजी, दिलीप दळवी, श्रीधर जाधव, विजय जाधव, सुमंत जाधव, मनोहर होसूरकर, अशोक चिंडक, माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, अर्जुन देमट्टी आदींसह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.