गेल्या वर्षभरापासून गोंधळ माजविलेल्या कोविड संसर्गामुळे अनेक हॉस्पिटल प्रशासनाची तारांबळ उडाली. गेल्या वर्षभरात कोविड निदान होण्याआधीच कोविड तपासणी करण्यात न आल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
बेळगावमध्येही अशीच परिस्थिती होती. परंतु नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे आता कोविड चाचणी करणे शक्य झाले आहे. बेळगावमधील प्रमुख रुग्णालयातील तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये आता कोविड चाचणी करता येणार आहे.
बेळगावमधील जिल्हा रुग्णालय, केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि लेकव्ह्यू हॉस्पिटल अशा तीन ठिकाणी नागरिकांना आता कोविड चाचणी करता येऊ शकते. यामध्ये जिल्हा रुग्णालयात कोविड चाचणीसाठी नमुने घेण्यात येत आहेत. शिवाय चाचणी देखील करता येणे शक्य आहे.
तसेच केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत कोविड नमुने आणि चाचणी तसेच आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी वेळ दिला आहे. तर मराठा मंडळ डेंटल कॉलेज मार्फत लेकव्ह्यू हॉस्पिटलच्या वतीने गोवावेस येथे नमुने घेण्यात येणार आहेत आणि चाचणी मराठा मंडळ डेंटल कॉलेज येथे करण्यात येत आहे.
शिवाय घरी भेट देऊन देखील नमुने घेण्यात येत आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती ०८३१२४०३३३३ या क्रमांकावर उपलब्ध होऊ शकेल. याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.