कर्नाटकात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून शुक्रवारी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोविडच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपर्यंत नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये जिम आणि जलतरण तलाव बंद करणे आणि पब, बार आणि थिएटरमध्ये बसण्याची क्षमता ५०% पर्यंत कमी करणे या गोष्टींचा समावेश आहे.
याचप्रमाणे मोर्चे, धरणे – आंदोलने, व सार्वजनिक ठिकाणी मेळावे घेण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळी भक्तांना दर्शनाची आणि प्रार्थनेची मुभा देण्यात आली आहे. अपार्टमेंट – कॉम्प्लेक्समध्ये जिम, पार्टी हॉल, क्लब हाऊसेस, जलतरण तलाव आदी सामान्य सुविधा बंद राहणार आहेत.
विद्यागमसह इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून, दहावी, अकरावी आणि बारावी वर्ग चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य नसल्याचे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
उच्च पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग बंद केले जातील. याशिवाय बोर्ड किंवा विद्यापीठ परीक्षा आणि आरोग्य- विज्ञान शाखांचा अभ्यासक्रम चालू राहील. . बोर्डिंग शाळा आणि निवासी वसतिगृहे, दहावी, अकरावी, बारावी आणि उच्च शिक्षण घेणार्या तसेच बोर्ड व विद्यापीठ परीक्षा व आरोग्य विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.
नियमावलीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे प्रत्येक नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा, अन्यथा संसर्ग वेगाने पसरण्याची शक्यता असल्याचे नियमावलीत सांगण्यात आले असून कोणत्याही प्रकारे संबंधित ठिकाणी संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास ते ठिकाण संसर्गाचा प्रभाव संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पब, बार, क्लब, रेस्टॉरंट्स मधील ग्राहकांची क्षमता क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. यावेळीही मास्क आणि सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर टाळणे आणि सामाजिक अंतर न राखणे किंवा नियमबाह्य कोणत्याही गोष्टी आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.