गाद्यांना बेडशीट्स नाहीत, उशांना अभ्रे नाहीत, स्वच्छतागृहाची दुरवस्था, नादुरुस्त सिटीस्कॅन मशिन आणि या सर्व प्रकारांनी त्रस्त झालेले रुग्ण व त्यांचे नातलग, हे चित्र आहे आपल्या बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलचे. जे पाहून सध्या हे हॉस्पिटलच ‘व्हेंटिलेटर’वर आहे की काय असे वाटू लागले आहे.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने सरकारला हादरवून सोडले असून सर्वत्र मृत्यूची छाया पसरविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संबंधित मार्गदर्शक सूची बरोबरच स्वच्छतेला अग्रक्रम देण्यात आला आहे. मात्र हा अग्रक्रम देणाऱ्या आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मात्र परस्परविरोधी चित्र दिसून येत आहे. सिव्हिलमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप होत असून या आरोपाला बळकटी देणारे चित्र हॉस्पिटलमध्ये पहावयास मिळत आहे.
कोरोनाचा नव्हे तर कोणत्याही रोगाची लागण झालेल्या रुग्णाची झोपण्याची जागा ज्या ठिकाणी असते ती जागा अत्यंत स्वच्छ साफसूफ ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता तर निर्जंतुकीकरणालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
तथापि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या सर्व बाबींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणच्या बेड्स अर्थात गाद्यांवरील बेडशीट्स रोजच्या रोज बदलणे तर दूरची गोष्ट येथील बहुतांश गाद्यांना बेडशीटसच घालण्यात येत नाहीत. गाद्यांप्रमाणे बेडवरील उशादेखील बिन अभ्र्याच्याच असतात. त्यामुळे रुग्णांवर नाईलाजाने रेक्झीनच्या गादी व उशीवर विश्रांती घ्यावी लागते. रुग्णांच्या वॉर्डमधील शौचालय व स्वच्छतागृहांची व्यवस्थित देखभाल केली जात नसल्यामुळे त्यांची अवस्था गलिच्छ झाली आहे. त्यामुळे आसपास दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. हॉस्पिटलच्या आवाराची देखील हीच अवस्था असून वेळच्या वेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी केरकचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळते. कोणीही दखल घेत नसल्यामुळे अखेर मध्यंतरी हेल्प फॉर नीडी या सेवाभावी संस्थेला श्रमदानाने या ठिकाणची स्वच्छता करावी लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सिव्हील हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशिन गेल्या सुमारे पंधरवड्यापासून नादुरुस्त असल्याने बंदावस्थेत आहे. त्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत असून अव्वाच्या सव्वा पैसा खर्च करून त्यांना खाजगी हॉस्पिटलमधून सिटीस्कॅन करून घ्यावे लागत आहे. एकंदर या पद्धतीने अनेक गैरसोय आणि बेजबाबदार कारभाराने ग्रासले गेलेले बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल सध्या स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे बोलले जात आहे. सदर हॉस्पिटलमधील अस्वच्छता, गैरसोय, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आदींबाबत वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही.
तेंव्हा आता लोकप्रतिनिधींनीच कांही दिवस येथे वास्तव्यास यावे. या ठिकाणच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव घ्यावा, अशी मागणी केली जात असून काय सांगावे किमान लोकप्रतिनिधी आल्यामुळे तरी सिव्हील हॉस्पिटलमधील कारभाराला शिस्त लागेल आणि रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.