बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज शनिवारी सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला असून सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण मतदार संघामध्ये 5.47 टक्के इतके मतदान झाले होते. म्हणजेच नऊ वाजेपर्यंत 8 विधानसभा मतदार संघातील एकूण 99 हजार 285 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सदर कालावधीत शहराच्या मानाने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह पहावयास मिळाला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला असला तरी शहरांमध्ये कांही मोजकी मतदान केंद्रे वगळता अन्यत्र मतदारांचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. शहराच्या तुलनेत आज सकाळी बेळगाव ग्रामीण भागात मात्र मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे या ठिकाणच्या बहुतांश मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. मतदानासाठी विशेष करून महिलावर्ग मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत होते. मोदका येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या ठिकाणी असणाऱ्या सखी मतदान केंद्राच्या ठिकाणी उभारलेली रंगीबिरंगी फुग्यांची कमान व सेल्फी बुथ मतदारांना आकर्षित करताना दिसत होते. मतदान उरकल्यानंतर उत्साही मंडळी विशेष करून युवावर्ग सेल्फी बूथ याठिकाणी आपला फोटो काढून घेण्याची हौस भागवताना दिसत होता.
मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जात होते. सोशल डिस्टंसिंग बरोबरच सॅनीटायझेशन आणि टेंपरेचर स्क्रीनिंग करूनच मतदारांना मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जात होता. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात तिरंगी लढत होणार असल्यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांसह समितीचे कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात आपले टेबल टाकून मोठ्या उत्साहाने मतदारांना त्यांचा मतदार क्रमांक काढून देणे तसेच आवश्यक ते अन्य मार्गदर्शन करताना पहायला मिळत होते.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे प्रारंभीच्या दोन तासात 5.47 टक्के इतके मतदान झाले होते. याचा अर्थ मतदार संघातील एकूण 99 हजार 285 मतदारांनी मतदान केले होते. बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये 340 मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू असून या मतदारसंघात 1,20,502 पुरुष आणि 1,22,105 महिला मतदार आहेत. या पद्धतीने इतर 11 धरून मतदार या संघाची एकुण मतदार संख्या 2,48,618 इतकी आहे. यासर्व मतदारांपैकी सकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 6,065 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये 336 मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू असून या मतदारसंघात 1,22,705 पुरुष आणि 1,20,316 महिला मतदार आहेत. या पद्धतीने इतर 6 धरून मतदार या मतदार संघाची एकुण मतदार संख्या 243027 इतकी आहे. यासर्व मतदारांपैकी सकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 6,804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये 356 मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू असून या मतदारसंघात 1,24,158 पुरुष आणि 1,99,922 महिला मतदार आहेत. या पद्धतीने इतर 4 धरून मतदार या मतदार संघाची एकुण मतदार संख्या 2,43,027 इतकी आहे. यासर्व मतदारांपैकी सकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 21,968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकंदर शहराच्या तुलनेत आज सकाळी बेळगाव ग्रामीण भागामध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदार संघातील अरभावी, गोकाक, बैलहोंगल, सौंदत्ती-यल्लम्मा आणि रामदुर्ग याठिकाणी आज सकाळी 9 वाजेपर्यंत पुढील प्रमाणे एकूण मतदान झाले होते. अरभावी (मतदान केंद्रे 345) -एकूण मतदान 12,480. गोकाक (मतदान केंद्रे 356) -एकूण मतदान 14,602. बैलहोंगल (मतदान केंद्रे 267) -एकूण मतदान 10,442. गोकाक (मतदान केंद्रे 345) -एकूण मतदान 14,602. सौंदत्ती-यल्लम्मा (मतदान केंद्रे 280) -एकूण मतदान 13,600. रामदूर्ग (मतदान केंद्रे 289) -एकूण मतदान 13,324.