Tuesday, January 14, 2025

/

कसा असेल खासदारपदाचा सामना? आणि काय आहे निवडणूक रणनीती?

 belgaum

बेळगाव जिल्हा हा कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांमधील एक जिल्हा आहे. यामुळे येथील राजकारण देखील तितक्याच मोठ्या पातळीवरील आहे. कर्नाटक मंत्रिमंडळातील अनेक नेते हे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. अशातच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकांचे पडघम वाजले असून निवडणूक रिंगणात उतरलेल्या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये निवडणुकीची जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे हे पद रिक्त झाले. यानंतर अवघ्या काही तासातच बेळगावच्या पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली. पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी इच्छुकांची मांदियाळी झाली. भाजपच्या इच्छुक यादीत तर माजी मुख्यमंत्र्यांनाही वगळले नाही. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हेवे-दावे करण्यात येऊ लागले. चर्चा-उपचर्चांना ऊत आला. आणि अखेर निवडणूक आयोगाने निवडणुकीचा मुहूर्त जाहीर केला. आणि सुरु असलेली लगबग ही धावपळीत बदलून गेली. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांच्या अधिकृत नावांची घोषणा झाली. काँग्रेसतर्फे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपने देशभरातील सर्व पोटनिवडणुकांचे उमेदवार निश्चित केले होते, पण बेळगावचा निर्णय घेतला नव्हता. काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निर्णय घेण्याची रणनिती आखली. घराणेशाहीच्या आधारावर मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली.

दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध मुद्दे पुढे करून प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी केंद्र सरकारचे दरवाढीबाबतचे धोरण, कृषी कायदे, जनविरोधी नीती, कर्नाटकातील पूरग्रस्तांना न मिळालेली आर्थिक नुकसान भरपाई हे मुद्दे पुढे करत आपला प्रचार सुरु ठेवला आहे. प्रचारादरम्यान विरोधकांनी मात्र डी. के. शिवकुमार यांचे विचार, विकासाचे गाजर दाखवून भ्रष्टाचार करणे, विकासाच्या नावाने जनतेची दिशाभूल करणे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसला घराणेशाहीची कीड असल्याचे बोलले जाते. घराणेशाही पुढे करण्यात येत असल्याचेही आरोप केले जातात. सतीश जारकीहोळी यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात उतरवले असून त्यांच्या या गोष्टीवर टीका करण्यात येत आहे. शिवाय त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी यांच्या नुकत्याच बाहेर आलेल्या सीडी प्रकरणीदेखील त्यांनी काही अंशी जनतेचा रोष ओढून घेतला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वी काँग्रेस सत्तेत बेळगावचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांमुळे त्यांनी असंख्य जनतेची मने जिंकली आहेत. सतीश जारकीहोळी हे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. ते तीनवेळा राज्याचे मंत्री होते. त्यांचा यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघ (चिकोडी-सदलगा लोकसभा, बेळगाव) हा बेळगाव लोकसभा मतदारसंघात येत नाही, तरीही बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अन्य उमेदवारांचा टिकाव लागणार नाही, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मंगला अंगडी यांचे बेळगावसाठी कोणतेही योगदान नाही. परंतु केवळ सहानुभूती आणि भावनिक दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ साली आलेल्या ‘मोदी फिव्हर’ मुळे बेळगाववर भाजपाचीच सत्ता आली. दिवंगत मंत्री सुरेश अंगडी यांनी तब्बल चारवेळा खासदारपदी विजय मिळविला. घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. भाजपाकडून घराणेशाहीच्या बाबतीत काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. परंतु घराणेशाहीमध्ये भाजपाही काँग्रेसच्या पुढे असल्याचं आता बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीमधून समोर आलं आहे. मंगला अंगडी यांच्या व्यक्तिशः मुद्द्यांऐवजी या निवडणुकीत केवळ पक्ष तत्वांच्या आधारे त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. हिंदुत्व या प्रमुख मुद्दयासह सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात बेळगाव रेल्वेस्थानकाचा झालेला कायापालट आणि रेल्वे स्थानकाचा विकास हे प्रमुख मुद्दे प्रचारादरम्यान उपयोगी ठरत आहेत. शिवाय बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत समाजाची मतपेढी अधिक असल्याने लिंगायत समाजाची मते अधिक मिळण्याची शक्यताही राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

लोकसभेच्या सन २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सुरेश अंगडी यांनी पराभव केला. त्यानंतर २०२१ पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी अनेक अपक्ष महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढविली आहे. परंतु आतापर्यंत एकही महिला खासदारपदी निवडून आली नाही. भाजपच्या रणनीतीनुसार जर मंगला अंगडी यांचा विजय झाला, तर बेळगाव जिल्ह्याच्या खासदारपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला खासदार ठरणार आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात २००४ पर्यंत काँग्रेसचा प्रभाव होता, परंतु त्यानंतर याठिकाणी केवळ भाजपाचीच सत्ता कायम आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी फीव्हरमुळे एकहाती सत्ता भाजपाला मिळाली. परंतु बेळगाव लोकसभेसाठी सध्या निवडणूक रिंगणात उतरलेले धर्मनिरपेक्ष तत्वांचे सतीश जारकीहोळी आणि हिंदुत्व या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या उमेदवार, आणि केवळ सहानुभूती म्हणून निवडण्यात आलेल्या सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी म्हणजे हा सामना काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन विरुद्ध भाजपचा जातीयवादी दृष्टिकोन असाच रंगण्याची शक्यता आहे.

-वसुधा कानूरकर सांबरेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.