Monday, November 18, 2024

/

निवडणुक जवळ आली तरी धामधूम नाही : प्रथमच महिला उमेदवार रिंगणात

 belgaum

बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या येत्या 17 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वातावरण अद्यापही तापलेले दिसत नाही. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने आपले अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवले असून अपक्षांनीही बऱ्यापैकी उमेदवारी दाखल केली आहे. तथापि छाननी आणि अंतिम माघारी नंतरच निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे  बेळगावात भाजप कडून प्रथमच एक महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे हे विशेष होय.

येत्या 17 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे वातावरण अद्यापही छापलेले दिसत नाही. मात्र काँग्रेस व भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी भेटीगाठी यांचे सत्र सुरू ठेवले आहे. रिंगणात उभ्या असलेल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची निवड उशिरा करण्यात आली. त्यामुळे प्रारंभी या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण असतील? याविषयीचा संभ्रम कायम होता. मात्र जसजशी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत गेली तशी दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली, अर्थात कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूची आणि अन्य बंधनांच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.

काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा थोड्या आधीच करून यमकनमर्डीचे आमदार व केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नांवाची घोषणा केली. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाकडे लायक उमेदवार नसल्यामुळे गोची झाली होती. मुळातच सतीश जारकीहोळी यांची या निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा नव्हती. कारण बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर मराठी व कन्नड असा द्विभाषिक मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीत स्पर्धा करणारा उमेदवार हा दोन्ही भाषिकांना जवळचा वाटणारा असला पाहिजे. सतीश जारकीहोळी यांनी गेल्या 10 वर्षात बेळगाव लोकसभा मतदार संघातील मराठी भाषीक खेड्यांमधील ग्रामपंचायतींवर आपले प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी कांही ग्रामपंचायती त्यांच्या वर्चस्वाखाली देखील आहेत.

भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी या नव्यानेच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरले आहेत. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या पत्नी असलेल्या मंगला अंगडी या उच्चविद्याविभूषित आहेत. कै. सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा बेळगाव लोकसभा मतदार संघातून विजय मिळविला असल्याने त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव मंगला यांच्या पाठीशी आहे. आता केवळ त्याच पाठबळाच्या जोरावर त्या निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र दिसते. मुळातच त्यांच्या उमेदवारी विषयीची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असली तरी कालांतराने ती दूर होईल. केवळ अंगडी कुटुंबांपैकी एकाला उमेदवारी देण्याविषयीचा दबाव वाढल्याने आणि सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे सहानुभूती मिळण्याची शक्यता ध्यानात घेऊन हायकमांडने मंगला यांना ही उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे मंगला अंगडी यांच्या  स्वरूपात भाजप कडून प्रथमच एक महिला उमेदवार बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असणार आहे हे विशेष होय.

बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस परंपरागत म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडेच राजकीय चित्र पूर्णपणे बदलल्याने तरुणवर्ग भाजपकडे अधिक आकर्षिला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपातील एक नवे नेतृत्व पुढे आल्याने या लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश अंगडी हे विजयी झाले होते. त्यामुळे भाजपच्या मंगला अंगडी व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यातील चुरस अधिक रंगत जाणार आहे. तथापि या मतदार संघाची एकूणच मदार ही 2 लाखाहून अधिक असणाऱ्या मराठी भाषिक मतदारांवर असणार, हे मात्र निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.