बेळगाव जिल्हा पोटनिवडणूक आज पार पडली असून संपूर्ण जिल्ह्यात आज ५४.०२ टक्के मतदान पार पडले आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध मतदार संघातील मतदार केंद्रांमध्ये सकाळी मतदारांची रांग पहायला मिळाली. त्यानंतर हळूहळू मतदारांचा ओघ कमी झालेला दिसून आला. एकूण १८१३५६७ मतदार या निवडणुकीचा हक्क बजावणार होते. परंतु संपूर्ण बेळगाव जिल्यात केवळ ५४.०२ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.
अरभावी तालुक्यात ५५.०७ टक्के, गोकाक तालुक्यात ६०.४७ टक्के, बेळगाव उत्तर विभागात ४२.८८ टक्के, बेळगाव दक्षिण विभागात ४४.८४ टक्के, बेळगाव ग्रामीण विभाग ५८.३६ टक्के, बैलहोंगल ५८ टक्के, सवदत्ती ५८.६७ टक्के, आणि रामदुर्ग मध्ये ५५.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ६९.७२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. तर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत एकूण ६८.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१९ आणि २०२१ साली झालेल्या निवडणुकीत १५.७ टक्के मतदारांची तफावत आहे. २०२१ साली झालेल्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असल्याचे दिसून आले.
सध्या सोशल मीडिया हे एक उत्तम प्रसाराचे आणि प्रचाराचे साधन झाले आहे. अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक प्रचार, पक्षाचा प्रचार आणि याशिवाय मतदानाविषयी जागृती केली. परंतु या अनुषंगातून पाहता म्हणावे तसे मतदान पार पाडले नाही. तरुण पिढी मतदानाचा हक्क वाजविण्यासाठी पुढे सरसावत आहे. मतदानाविषयी प्रचार करत आहे. जनजागृती करत आहे. परंतु असंख्य मतदार मतदान करण्यासाठी पुढे सरसावले नाहीत. कोरोना परिस्थितीमुळे अनेक उमेदवार कदाचित मतदान केंद्राकडे वळले नाहीत, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हा पोटनिवडणुकीसाठी सुरु असलेली निवडणूक धामधूम सध्या संपली आहे. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. येत्या २ मे रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.