बेळगाव उत्तर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले आणि समितीच्या प्रवाहात अजून तरी अधिकृतपणे असलेले बाळासाहेब काकतकर सध्या वादात अडकले आहेत. आपल्या कंपू सोबत जाऊन बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार आणि स्वर्गीय खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी गेलेले बाळासाहेब आणि इतर सर्वांवर सीमाभागात सोशल मीडियावर व जाहीर रित्या जोरदार टीका होत आहे. बाळासाहेब समितीच्या ज्या गटात आहेत त्या गटाच्या सर्वच नेत्यांनीही त्यांची हजेरी घेतली आहे, कारण बाळासाहेबांच्या या कृतीने इतर सर्व समिती निष्ठ नेत्यांच्या निष्ठवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आता सीमावासीयांची माफी मागून यापुढे असे कृत्य करणार नाही अशी हमी बाळासाहेबांनी द्यावी अशी भावना समिती नेते आणि कार्यकर्त्यांत आहे.बाळासाहेब काकतकर यांनी मंगला अंगडी यांची भेट घेतल्याने तसा कोणताच मोठा फरक पडत नाही. उत्तर मतदारसंघात आमदारकीची निवडणूक लढवताना बाळासाहेबांना जनतेचा किती पाठींबा मिळाला हे जगजाहीर आहे. बाळासाहेबांनी पाठींबा दिला म्हणून मराठी समाज आणि समिती निष्ठ मंगला अंगडी यांना मत घालेल असा विषय नाही. काल त्यांनी फक्त भेट घेतल्यावर निर्माण झालेला वाद पाहिला तर हेच स्पष्ट होत आहे. असे असताना बाळासाहेब काकतकर यांना जर आपली निष्ठा दाखवून आपला समाजातील मान कायम राखायचा असेल तर लवकरात लवकर आपण चुकलोय आणि जायला नको होते हे मान्य करावे लागणार आहे.
समिती नेत्यांपैकी कुणी बाळासाहेबांना मंगला अंगडी यांची भेट घेण्यास पाठविले होते? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. मात्र तसे कुणाचाही सल्ला न घेताच बाळासाहेबांनी आपल्या कंपूला घेऊन हे कृत्य केले आहे अशी माहिती समोर येत आहे.
बाळासाहेब काकतकर यांच्या सोबत शिवाजी हंडे,शिवाजीराव हंगिरगेकर आणि नारायण किटवाडकर श्रीकांत देसाई यांनी देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्याशी त्यांचे संबंध घनिष्ट होते, यातूनच ही भेट झाली असली तरी त्यामुळे सीमावासीय जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत.
खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच, मराठी मते यापुढे राष्ट्रीय पक्षांना देणार नाही. मराठी अडचणीत आली की राष्ट्रीय पक्ष येत नाहीत तेंव्हा आपली ताकद दाखवून देऊ या भावनेतून समितीच्या आंदोलनात तरुण पिढी युवा समिती पुढे येत आहे. अशावेळी बाळासाहेब यांच्यासारख्या व्यक्तींनी राष्ट्रीय पक्षांची तळी उचलून धरणे कितपत योग्य आहे? त्यांना मराठीची अस्मिता नाही का? असे प्रश्न पडत असून वातावरण बिघडत आहे. यावर लवकरात लवकर अधिकृत विधान आल्यास मराठी अस्मितेच्या लढ्याला बळकट करणे शक्य होईल.
https://www.instagram.com/p/CM8rF3khSzx/?igshid=c4j2wotkkpsj