बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा अंदाज वर्तविणे मात्र असाध्य होत चालले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या रांगेत अनेकांची नवे आतापर्यंत चर्चेत आली असून अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.
मुख्यमंत्र्यांविरोधात सातत्याने टीका करणाऱ्या आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांचे नाव आता चर्चेत आले आहे. भाजपमध्ये असूनही सत्ताधारी मंत्र्यांवर टीका करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बसनगौडा पाटील – यत्नाळ यांचे नाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी चर्चेत आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात सभागृहात तसेच इतर वेळीही बंद पुकारणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापुढे आता मोठे आव्हान उभे आहे. सातत्याने आपल्यावर टीका करणाऱ्या आमदारांना नवी दिल्ली येथे पाठवून मुख्यमंत्री येडियुरप्पांनी आमदारांना केंद्रीय मंत्रीपदी विराजमान करण्यासाठी मास्टर प्लॅन राबविला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. तसेच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार यत्नाळ यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याच्या विचारात भाजप असल्याचेहि वृत्त हाती आले आहे.
उत्तर कर्नाटकातील लिंगायत पंचमसाली समाजाचे प्रभावी नेतृत्व म्हणून यत्नाळ यांच्याकडे पाहिले जाते. पंचमसाली समाजाला २ए प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलनदेखील छेडले होते. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुकांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
यामध्ये आता बसनगौडा पाटील – यत्नाळ यांचे नाव समाविष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागे सातत्याने या ना त्या कारणाने टीका करणाऱ्या यत्नाळ ना बेळगावमधून निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक रिंगणात उभे करण्यात येणार असून त्यांना निवडून देऊन बेळगावमधून केंद्रीय मंत्रीपदी शिफारस करून मुख्यमंत्र्यांचा मार्ग सुकर करण्याच्या विचारात भाजप असल्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे.