भाग्यश्री सुरेंद्र अनगोळकर हे नांव बेळगावच्या सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये तसे नवे असले तरी यांचे कर्तुत्व अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे बेळगाव शहरात हेल्प फाॅर नीडी, फुड फाॅर मेडिकल आणि एज्युकेशन फाॅर नीडी हे जे स्तुत्य प्रकल्प राबविले जातात या प्रकल्पाच्या खऱ्या आभारस्तंभ भाग्यश्री अनगोळकर या आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनची स्थापना 2017 साली झाली. प्रारंभी या फाउंडेशनतर्फे गरीब व भुकेल्या लोकांसाठी फुड फाॅर निडी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. फुड फाॅर निडी प्रकल्पाअंतर्गत त्यावेळी सिव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातलगांना रात्री एक वेळचे मोफत भोजन दिले जात होते. तेंव्हा भाग्यश्री अनगोळकर दररोज सायंकाळी 200 लोकांचे जेवण तयार करत होत्या तर त्यांचे पती सुरेंद्र अनगोळकर सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन मेटर्निटी वॉर्डनजीक त्या भोजनाचे वाटप करत होते. अनगोळकर दांपत्याकडून आज देखील हा उपक्रम राबविला जात आहे.
2018 साली सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे मोफत शववाहिका सेवा सुरू करण्यात आली. तसेच एज्युकेशन फाॅर निडी प्रकल्पाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत देण्यात येऊ लागली. आज अनगोळकर फाउंडेशनतर्फे शैक्षणिक क्षेत्राला मदत करण्याबरोबरच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हेल्थ क्लासेस, हायजिन क्लासेस त्याचप्रमाणे मोटिव्हेशन क्लासेस घेतले जातात. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या काळात भाग्यश्री आणि सुरेंद्र अनगोळकर यांनी दररोज 1000 मोफत अन्न पाकिटे वितरीत करून अनेकांची भूक भागविली आहे.
या काळात सुरेंद्र अनगोळकर आजारी पडले होते. त्यावेळी हताश न होता भाग्यश्री यांनी आपल्या पतीच्या उपचारांकडे लक्ष देण्याबरोबरच त्यांचे सामाजिक कार्य पुढे निरंतर सुरू ठेवले. त्या काळात अतिरिक्त जबाबदारी घेताना भाग्यश्री अनगोळकर यांनी स्वतः शववाहिका आणि रुग्णवाहिका चालवून शहरात एक नवा आदर्श निर्माण केला. आज भाग्यश्री अनगोळकर यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. पतीच्या खांद्याला खांदा लावून समाज सेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या भाग्यश्री यांच्या कार्याची दखल घेऊन येत्या जागतिक महिला दिनी विजयवाणी कन्नड वृत्तपत्रातर्फे त्यांना सन्मानित केले जाणार आहे.