अश्लील सीडी प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या बेळगावमध्ये दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून दुसऱ्या बाजूला पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी बाहेर पडलेल्या सीडीप्रकरणानंतर कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रश्नी विरोधकांनी सरकारला घेरलं असून सध्या कर्नाटकात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी मात्र या आरोपात कोणतेही तथ्य नसून या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण देईन, असे सांगितले आहे.
आपल्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये, पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आणि तो मंजूरही झाला. यानंतर मात्र बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद रिक्त झाले असून या पदावर कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न जोरदार चर्चेत येऊ लागला आहे.
जारकीहोळी बंधू आणि हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांचे जवळचे संबंध आहेत. उमेश कत्ती यांची नुकतीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड करण्यात आली असून भालचंद्र जारकीहोळी यांचे नाव अधिक चर्चेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावचे नाव घेण्यात येते. या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाच्या वर्णी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत असून गेल्या दहा वर्षांपासून जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यावर असणारे राजकीय वर्चस्व लक्षात घेता भालचंद्र जारकीहोळी यांची निवड जिल्हापलकमंत्रीपदी होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात तत्कालीन काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी आणि सतीश जारकीहोळी हे बंधू पालकमंत्रीपदी विराजमान होते. पक्षांतर करून सरकार कोसळवणाऱ्यांमध्ये रमेश जारकीहोळी यांचाही समावेश होता. भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर देखील बेळगावचे जिल्हा पालकमंत्रिपद रमेश जारकीहोळींकडेच कायम राहिले. मात्र अचानक सीडी प्रकरण बाहेर आल्यानंतर रमेश जारकीहोळींनी राजीनामा दिला असून बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे कुणाच्या हाती जाणार? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचेही राजकीय वजन आहे. परंतु सवदी हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या माध्यमातून येऊन उपमुख्यमंत्रीपद मिळविले. रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर आता बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी कोण असेल? याची चर्चा बेळगावच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.