महाराष्ट्र आणि केरळ राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. कर्नाटक आरोग्य खात्याने एक परिपत्रक काढून या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. चालकांना तसेच क्लिनर ना देखील ही चाचणी सक्तीची असेल असे निश्चित करण्यात आले आहे.
आरोग्य खात्याचे आयुक्त के व्ही त्रिलोक चंद्र यांनी याची घोषणा केली आहे. राज्यात प्रवेश करण्यापूर्वी किमान १५ दिवसांच्या काळात आर टी पीसीआर चाचणी केलेली असली पाहिजे. तसे नसल्यास त्या ट्रक ना राज्यात प्रवेश दिला जाणार नाही.
ज्या जिल्ह्यात कोरोना च्या रुग्णांची संख्या वाढत आहे तेथील सरकारी अधिकाऱ्यांशी स्वतः मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून सूचना देणार आहेत. बंगळूर शहर, म्हैसूर, चमराजनगर, उडपी,कोडगू, बेळगाव आणि तुमकुर च्या बाबतीत जास्त काळजी घेतली जात आहे.
यापूर्वी महाराष्ट्र आणि केरळ येथील प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. ७२ तासातील चाचणी अहवाल नसेल तर प्रवेश नाकारण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आता या राज्यातून येऊन कर्नाटकातील हॉटेल्स, लॉजिग, रिसॉर्ट, हॉस्टेल्स, घरे यामध्ये प्रवेश करणाऱ्यांनाही आर टी पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले जाणार आहे.