बेळगावच्या भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधाम अर्थात प्राणी संग्रहालयामध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, गवी रेडे आदी प्राण्यांसह विविध पक्षी ठेवण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. ट्विटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आता सिंहांपाठोपाठ म्हैसूर प्राणी संग्रहालयातून वाघ, बिबटे, सांबर, हरणं, तरस हे प्राणी लवकरच बेळगावला आणले जाणार आहेत.
गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेंगलोरच्या बंनेरुघट्टा जैविक उद्यानातून 3 आशियाई सिंह भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा संग्रहालयामध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत. या तीनही सिंहांना आणल्या आणल्या काॅरंटाईन करण्यात आले आहे. आता लवकरच जे अन्य प्राणी हस्तांतरित होणार आहेत, त्यांनादेखील काॅरंटाईन केले जाणार आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये सिंहांसाठी काचेची भिंत तयार असून वाघ टायगर सफारीसाठी खुल्या जागेचा भाग असतील. सफारी फेन्सिगचे काम देखील पूर्ण झाले असून वाघांची निवासस्थाने तयार आहेत. आधी मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या संमतीने म्हैसूर आणि बंनेरुघट्टा येथून प्रत्येकी 2 असे एकूण 4 वाघ बेळगावला आणले जाणार आहेत.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वर्गवारीनुसार भुतरामनहट्टी प्राणी संग्रहालय हे लघु प्राणी संग्रहालय (मिनी झू) प्रकारात मोडते. हे प्राणी संग्रहालय 1989 साली सुरू करण्यात आले, जे 34 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. प्राणी संग्रहालय हे असे एक उत्तम ठिकाण आहे जे जैवविविधतेचे महत्त्व सांगते आणि पर्यटकांना त्याच्या संवर्धनाची प्रेरणा देते. तसेच प्राण्यांच्या धोकादायक प्रजातीबाबत सचेतनही करते.