मारुती गल्ली येथील पोटविकार तज्ज्ञाकडे उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या तब्येतीत पुन्हा बिघाड झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसात देखील धाव घेण्यात आली.
जुनेबेळगाव येथील एका रुग्णावर मारुती गल्ली येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पुन्हा सदर रुग्णाला पोटविकार सुरु झाला आणि तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली.
दरम्यान या रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासंबंधी सुचविण्यात आले. रुग्णाच्या तब्येतीविषयी डॉक्टरांनी दुर्लक्ष केले असून निष्काळजीपणामुळे रुग्णाची तब्येत बिघडली असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर रुग्ण २१ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी मारुती गल्ली येथील रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर २२ तारखेला शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. त्यानंतर रुग्णाच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. शिवाय या रुग्णाला कर्करोग असल्याचे निदान झाले. यावेळी सदर डॉक्टरांना विचारले असता, बेजबाबदारपणाची उत्तरे देण्यात आली, शिवाय या रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे, असे सांगण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सदर शस्त्रक्रियेसंबंधी रीतसर चौकशी केली असता, हि शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली असलयाचे निष्पन्न झाले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. आज मारुती गल्ली येथील रुग्णालयासमोर दलित संघर्ष समिती आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी निदर्शने केली असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.