जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन आणि जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी यांनी आज जिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिन घेतली. ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मांडले आहे.
सरकारच्या मार्गसूचीनुसार जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या लसीकरणाच्या माध्यमातून आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, पोलीस कर्मचारी यांच्यासह विविध विभागाच्या एकूण ८१०८२ जणांना सर्वप्रथम लास देण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी बीम्स रुग्णालयात आलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांनी कोविद लस घेतली. यानंत पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ही लस अत्यंत सुरक्षित असून जनतेने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कोविड विरोधात लढा देण्यासाठी प्रत्येकाने लसीकरणाचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लसीकरणानंतर कोणालाही दुषपरिणाम जाणवले तर त्वरित जवळच्या लसीकरण केंद्रात संप्रर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.
१ मार्च २०२१ पासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग असलेल्या जनतेला लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ४,४७,९५३ जणांना लस देण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ही लस मोफत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २८ निवडक खाजगी रुग्णालयातदेखील ही लस देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयात या लसीसाठी प्रत्येकी २५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
सात चेकपोस्टवर सरकारच्या मार्गसूचीनुसार निगराणी ठेवण्यात येत आहे. राज्यातील सीमेवर कोविड निगेटिव्ह असल्याची खात्री करूनच प्रवेश देण्यात येत आहे. यात्रा, जत्रा आणि उत्सवावर निर्बंध कायम आहे. यल्लम्मा आणि चिंचली मायाक्का येथील देवस्थाने दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी ही सर्व खबरदारीची उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.