एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास बोळमळ गल्ली, खडेबाजार शहापूर येथे घडली.
सदर घर मृत्युंजय जी. बोळमळ यांच्या मालकीचे आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये घरामध्ये ठेवलेले कॉम्प्युटर्स तसेच अन्य साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाली. बोळमळ यांच्या घराच्या छपरामधून आज दुपारी धुराचे लोट बाहेर येऊ लागताच आसपासच्या लोकांना आगीची कल्पना आली. तेंव्हा एकाने लागलीच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.
आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. बोळमळ यांचे घर जुन्या धाटणीचे कडीपाटाचे असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. आग विझवताना अग्निशामक दलाचा एक जवान किरकोळ जखमी देखील झाला.
आगीचे वृत्त आसपासच्या परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सदर दुर्घटनेत सुमारे 4 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या शकील साळवी, अर्जुन दयण्णावर, एस. एम. सिंगारी, अल्लाबक्ष आणि बागवान या जवानांनी विशेष परिश्रम घेतले.