बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेनेच्या कार्यालयावर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून बोर्ड तोडण्याबरोबरच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी घडली. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी पुन्हा सुरू केला आहे. शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकावर आज शुक्रवारी दुपारी काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. याप्रसंगी रुग्णवाहिकेवरील बोर्ड तोडण्याबरोबरच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न केला गेला. सम्राट अशोक चौक येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांसमक्ष हा प्रकार घडत होता. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कन्नड गुंडाना अडवून पिटाळून लावले. मात्र यावेळी कन्नड गुंडांना रोखण्यास गेलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आणि शिवसैनिक प्रवीण तेजम यांनाच रोखण्याचा प्रयत्न झाला. परिणामी शिरोळकर आणि त्यांचे सहकारी विरुद्ध कन्नड संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादीचा प्रसंग घडला. त्यानंतर खडेबाजार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकारामुळे सम्राट अशोक चौकामध्ये नागरिक आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांसमोर प्रत्येक जण संबंधित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध नोंदवताना दिसत होता. दरम्यान बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांसमक्ष शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड गुंडांनी खुलेआम हल्ला केल्याच्या या घटनेमुळे सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.