सध्या सीमाभागात सुरू असलेल्या कर्नाटक शासनाच्या दडपशाही विरोधात लोकसभेत आवाज उठवून सीमावासीयांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव यांनी नवी दिल्ली मुक्कामी खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनात बेळगावचा विषय मांडावा अशी विनंती केली. तसेच तशा आशयाचे निवेदन देखील सादर केले.
खासदार सावंत यांनी निवेदनाचा स्विकार करून लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव महापालिकेसमोर दोन महिन्यापूर्वी अनाधिकृत लाल -पिवळा झेंडा फडकविलाच्या घटनेमुळे या तणावाला सुरुवात झाली असून त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर करवे कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
या सर्व प्रकारामुळे बस वाहतूक ठप्प होऊन तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव यांनी दिल्ली येथे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन सीमावासियांवरील अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेने पावले उचलावीत आणि लोकसभेत हा प्रश्न मांडावा जेणेकरून मराठी भाषिकांना न्याय मिळेल अशी विनंती केली.