Monday, December 23, 2024

/

मराठी मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सोशल मीडिया तापली

 belgaum

सीमाभागात निवडून येणारे राजकारणी हे केवळ मराठी बहुमतांमुळेच निवडून येतात. मराठी भाषिकांच्या मनावर निवडणुकीपुरते राज्य गाजवून निवडणुकीत आपले इप्सित साध्य झाल्यावर ढुंकूनही न पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सोशल मीडियावर चांगलीच हवा पसरली आहे. मराठी मतांचा जोगवा मागून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सीमाप्रश्न, विकास आणि नागरी हक्कांचे गाजर दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत घरासमोर येऊन मते मागू नका, अशी सूचना सोशल मीडियावर दिसून आली.

रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकेचा नंबरप्लेटसोबत छेडछाड करून काळे फासण्यात आले. दरम्यान रुग्णवाहिकेवर असलेल्या नंबरप्लेटची मोडतोड करण्यात आली. रुग्णवाहिकेवर लावलेल्या भगव्या झेंड्याशीही छेडछाड झाली. शिवसेना कार्यकर्त्यांशी वादावादी झाली. हा सारा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत करवेच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी केला. यानंतर सीमाभागात संतप्त प्रतिरकीय उमटू लागल्या. गुरुवारी आंबेडकर रोड येथे असणाऱ्या नामफलकाशीही छेडछाड झाली. नामफलक असणाऱ्या मराठी अक्षरांवर काळे फासण्यात आले. तसेच महानगरपालिकेसमोर अनधिकृतपणे लाल – पिवळा लावण्यात आला.

मणगुत्ती, पिरनवाडी येथे झालेले शिवमूर्ती प्रकरण, नावगे गावात बसवरील मराठी अक्षरे पुसण्याचा प्रकार या साऱ्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर कोणतेही लोकप्रतिनिधी मराठी भाषिकांच्या बाजूने उभे राहिले नाहीत. सीमाभागात प्रशासन, पोलीस विभाग आणि आता कन्नड संघटनांच्या चाललेल्या दडपशाहीमुळे मराठी भाषिक संतप्त झाले आहेत.

सीमाभागात कन्नड संघटनांकडून होणारे हे सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत होत आहेत, हे विशेष! प्रत्येक वेळी मराठी भाषिकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे देऊन, नोटीस आणि सतत सूचना करणाऱ्या पोलीस विभागाला कन्नड संघटनांचा हैदोस दिसत नाही का? असा सवाल आता जनता उपस्थित करू लागली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस उपस्थित असताना रामलिंग खिंड गल्लीत तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या संरक्षणातच हा प्रकार घडवून आणण्यात आला. जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलिसांना कोणताही पक्ष नसतो. केवळ कायदा आणि कायद्याचे रक्षण करणे हे कर्तव्य पोलिसांचे असूनही डोळ्यादेखत कायदा हाती घेणाऱ्या अशा म्होरक्यांवर पोलीस कधीच कारवाई करताना किंवा असे प्रकार होण्यापासून रोखताना दिसत नाहीत.Sena office attack

मनपावरील झेंडा प्रकरण, मराठी फलकांची मोडतोड, विनाकारण तणाव निर्माण करणे, आंबेडकर रोडवरील नामफलकावर काळे फासणे, मणगुत्ती, पिरनवाडी, नावगे, रामलिंग खिंड गल्लीत रुग्णवाहिकेच्या नंबरप्लेटवर फासण्यात आलेले काळे हे सारे प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत झाले आहेत. परंतु या साऱ्या प्रकरणांमध्ये पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कायद्याचे रक्षण करणारे आणि जनतेच्या सेवेची शपथ घेणारे पोलीसच अशा पद्धतीने भूमिका घेत असतील, तर मात्र मराठी जनतेवर नक्कीच अन्याय होत राहील.

शुक्रवारी अनेकांनी सोशल मीडियावर बेळगांव बेळगावातील आमदारानी यापुढे मराठी लोकांच्या दारात मत मागायला येऊ नका, असा इशारा दिला आहे. याबाबत अनेकांनी स्टेटस डी पी ठेवले असून सोशल मीडियावर लोक प्रतिनिधीवर चांगलीच टीका केली आहे.

बेळगाव शहर ग्रामीण खानापूर सह सीमा यमकनमर्डी लोकप्रतिनिधीना यांना टॅग करून आगामी निवडणुकीत मराठी माणसांच्या मतांसाठी जोगवा मागायला न येण्याचे आवाहन केले आहे. मराठी भाषिक जनता सोशिक आहे नक्की. परंतु आपल्या संस्कृतीविरोधात अशापद्धतीने वाकडी नजर ठेवण्यात येत असेल, आणि संस्कृती वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधी एकही अक्षर काढत नसतील, तर अशा लोकप्रतिनिधींची आपल्याला गरज नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.